तहसील कार्यालयावर सर्व संमभाव कौमी एकता रॅली
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर दोन धर्मात तेड निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून आणि देशात आराजकता माजवण्यासाठी नागरिकत्व कायदा आणल्याची जोरदार टिका शहरवासींनी केली. केंद्र सरकारने भारतीय संविधानाचे कलम १४, १५ व २५ चे उल्लंघन करून भारतीय नागरिकत्व कायदा संसदेत आणि राज्यसभेत पारित केल्याच्या आरोप करित कायद्याच्या निषेधार्थ शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चायात तालुक्यातील सर्व समाज बांधव आणि सर्व पक्षीय नेत्यांनी तहसीलदाराला निवेदन देवून कायदा रद्द करण्याची मागणी केली.
एनआरसी व सीएए हा प्रश्न केवळ मुस्लिमांचा नसून मोदी सरकार सर्वांना पुन्हा एकदा रांगेत उभे करून वडिलोपार्जित कागदपत्रे सादर करायला लावणार आणि नागरिकता द्यायची की नाही हे ठरवणार आहे. आर्थिक पातळीवरील अपयशापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा घाट आहे. भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर हा मोठा हल्ला असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. दि. २० डिसेंबर रोजी दुपारी जुनी नगर पालिका चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. जुनी नगर पालिका पासून सुरू झालेला हा मोर्चा थेट तहसिल कार्यालयात धडकला. यावेळी उपस्थित मोर्चेकरींना संबोधित करतांना मौलाना अशरफ रजा, मौलाना रियाज, भाई दिलीपकुमार झोटे, भाई दिलीप खरात, मनोज कायंदे, संतोष खांडेभराड, हाजी सिद्दीक, राजेश इंगळे हे सर्व म्हणाले की, भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर भारतीय संविधानाच्या मूळ चौकटीला छेद देत हा कायदा पारीत केला. देशातील नागरिकांच्या स्वातंत्रता, समता आणि बंधुता यावर घाला घालून हिंदू व मुस्लिम लोकांत आग लावण्याचा प्रकार सरकारने घडवून आणल्याचा आरोप यांनी केला. धर्म निरपेक्ष देशात सरकारची हुकूमशाही देशातील जनता खपून घेणार नसल्याचा इशारा देखील अॅड.नाझेर काझी यांनी यावेळी भाजप सरकारला दिला. यावेळी तहसीलदार सारीका भगत यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना सर्व धर्मीय व पक्षीय नेत्यांनी निवेदन दिले. भारतीय संविधानात भेदभाव सरकारने करून नये, एकता समताला वेगळ करण्याचा हा भाजप सरकारचा डाव असून नागरिकत्व कायद्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आवाहन देऊ असे. सरकारने नागरिकत्व कायद्या विरोधात सर्वांनी संघटीत होऊन लढण्याची गरज असल्याचे मत यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अॅड.नाझेर काझी यांनी केंद्र सरकारने भारतीय संविधानाचे कलम १४, १५ व २५ चे उल्लंघन करून भारतीय नागरिकत्व कायदा संसदेत आणि राज्यसभेत पारित केलेले बिल फाडून निशेष केले. तालुक्यातील सर्व समाज बांधव तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त
वादग्रस्त नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून देशात रणकंदन सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरात काढण्यात आलेल्या या मोर्चा दरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये त्या अनुषंगाने ठाणेदार संभाजी पाटील यांनी शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.






1 no
ReplyDelete