Saturday, January 4, 2020

डिजिटल साक्षरता महिलांना स्वावलंबी बनवते - प्राचार्या डॉ. नीलिमा देशमुख



श्री व्यंकटेश महाविद्यालयात एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न 
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
महिलांना प्रत्येक क्षेत्रात सामान संधी मिळावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेतच परंतु, यात महिलांनी सुद्धा स्वतःहुन पुढाकार घ्यावा. काळानुसार होणारे बदल लक्षात घेऊन तंत्रज्ञान समजून घ्यावे, त्याचा वापर करावा. डिजिटल साक्षरता हा तंत्रज्ञानाचा भाग असून यामुळे महिला स्वावलंबी बनतील असे प्रतिपादन सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगाव येथील प्राचार्या डॉ. नीलिमा देशमुख यांनी केले. 
        स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई पुरस्कृत 'महिलांसाठी डिजीटल साक्षरता' या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली, या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद देऊळगाव राजाच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम बुलडाणा येथील जिल्हा सल्लागार व मानसोपचार तज्ञ डॉ. लता भोसले- बाहेकर या उपस्थित होत्या. या समारोहासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव हे उपस्थित होते.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे उदघाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. महिलांनी समाजामध्ये असलेला छुपा भेदभाव ओळखावा व त्याचा प्रतिकार करावा. स्वबळावर लढण्याचे धाडस स्वतःत निर्माण करावे तरच महिला सबलीकरण साध्य होईल असा सल्ला डॉ. नीलिमा देशमुख यांनी दिला. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी मार्गदर्शन करताना स्त्रियांवर होणारे अन्याय वाढत चालले आहेत अशी खंत व्यक्त केली. स्त्रियांच्या बाबतीत जे विषमतेचे धोरण अवलंबले जाते त्यावर स्त्रियांनीच तोडगा शोधायला हवा यासाठी 'डिजिटल साक्षरता' सारखे शस्त्र वापरता येईल अशी माहिती घार्गे यांनी दिली. अतिथी म्हणून उपस्थित मानसोपचार तज्ञ डॉ. लता भोसले-बाहेकर यांनी महिलांनी मानसिकदृष्ट्या खंबीर राहून येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. स्वतःच्या भावनांचा आदर करायला शिकावे, असे आवाहन केले. बदल घडवून आणायचा असेल तर सुरुवात स्वतः पासून करावी लागते, असा सल्ला डॉ. भोसले यांनी दिला. या एकदिवसीय कार्यशाळेच्या मार्गदर्शन सत्रामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मान्यताप्राप्त प्रशिक्षक प्रियंका मोरे यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून डिजीटल साक्षरतेचे महत्व पटवून दिले. डिजीटल साक्षर असणे म्हणजे केवळ फेसबुक, व्हाट्सअप वापरता येणे एवढे मर्यादित नसून मोबाईलच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता यावेत. लाईट बील भरता यावे, रेल्वे तिकीट बुक करता यावे, अशी माहिती प्रिय॔का मोरे यांनी दिली.
या कार्यशाळेच्या उदघाटन समारोहासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी तंत्रज्ञानाने जग जवळ आणलेलं आहे आपण ते समजून घेतल पाहिजे त्याबाबतचं शिक्षण, प्रशिक्षण घेतलं पाहिजे असे मत व्यक्त केले. महिलांसाठी डिजीटल साक्षरता प्रगतीचा उत्तम मार्ग ठरू शकतो, यामुळेच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी दिली.  या कार्यशाळेच्या उदघाटन समारोहाचे सूत्रसंचालन प्रा.एम.बी.जाधव यांनी केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय कार्यशाळा समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार डॉ. ज्योती ढोकले यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेस देऊळगाव राजा शहर व परिसरातील विविध महिला बचत गटांच्या पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 comment: