श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे रा.से.यो. शिबिर संपन्न
देऊळगाव राजा : प्रतिनधी
आपल्यामध्ये संवेदना, जाणिवा जागृत असतील तरच माणसांपर्यंत पोहचता येते, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व ख्यातनाम वक्ते डॉ. प्रफुल्ल गवई यांनी केले. दत्तकग्राम पिंपळगाव (चि) येथे श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबिर समारोप समारोह प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव उपस्थित होते. अतिथी म्हणून देऊळगाव राजा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, पिंपळगाव येथील सरपंचपती श्री. दिपक पवार, उपसरपंच सौ. शोभा जोशी, ग्रामसेवक बी.यु. तिडके, ग्राम पंचायत सदस्य सौ. मालन पिंपळे, शिवशंकर तोरमल, संतोष जोशी, गणेश पिंपळे आदी उपस्थित होते.
महाविद्यालयातील रा.से.यो. विभागाच्या वतीने 'उन्नत भारत सशक्त भारत' हे ब्रीद घेऊन दि. ०४ जानेवारी ते ११ जानेवारी, २०२० दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. डॉ. गवई यांनी मार्गदर्शन करताना रा.से.यो. म्हणजे केवळ श्रमसंस्कार देणारे नसून सर्वांगीण विकास घडविणारे माध्यम आहे, अशी माहिती दिली. समाजामध्ये सुव्यवस्था येणे गरजेचे आहे त्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा असे आवाहनही डॉ. गवई यांनी केले. मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी अतिथी म्हणून मत व्यक्त करताना विद्यार्थी जीवनात घेतलेला प्रत्येक अनुभव हा आयुष्यभराची शिदोरी असतो, असे प्रतिपादन केले. शिबिरादरम्यान केलेल्या कामाची घार्गे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी सरपंचपती श्री. दिपक पवार, ग्रामसेवक बी.यु. तिडके, संतोष जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सेवाभाव व नियोजनबद्ध कामकाज असे अनेक गुण विकसित झाले तर हे आमच्या परिश्रमाचे फलित असेल असे प्रतिपादन केले. विशेष श्रमसंस्कार शिबिरादरम्यान रा.से.यो. स्वयंसेवकांनी श्रमदानाच्या माध्यमातून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ४५ शोषखड्डे खोदले. नालेसफाई, परिसर स्वच्छता या उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती केली. उन्नत भारत सर्वेक्षण अभियानदेखील शिबिरादरम्यान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची बीजे पेरण्यासाठी शिबिरादरम्यान बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांसाठी सायंकालीन सत्रामध्ये समाजप्रबोधनपर कीर्तन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये रा.से.यो. स्वयंसेवक, प्राध्यापकांसह ग्रामस्थांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. शिबिर समारोप समारोहाचे सूत्रसंचालन रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी प्रा. मधुकर जाधव यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब काळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, पत्रकार बंधू, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक-स्वयंसेविका बहुसंख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment