Sunday, January 5, 2020

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे संस्काराचे समृद्ध दालन -- डॉ. संतोष कुटे



श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न
देऊळगावराजा : प्रतिनिधी
        राष्ट्रीय सेवा योजना जे उपक्रम राबवते ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक असतात. विद्यार्थीमनावर संस्कार घडविण्यासाठीचे समृद्ध दालन म्हणूनही रा.से.यो. चा उल्लेख केला जातो, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती च्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष कुटे यांनी केले. दत्तकग्राम पिंपळगाव (चि) येथे श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन समारोह प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. 
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव उपस्थित होते. अतिथी म्हणून पिंपळगाव येथील सरपंचपती श्री. दिपक पवार, उपसरपंच सौ. शोभा जोशी, ज्येष्ठ पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर खांडेभराड, सौ. मालन पिंपळे, काळुबा खरात, शिवशंकर तोरमल  संतोष जोशी, सुनील खांडेभराड, गणेश पिंपळे, अंबादास खांडेभराड आदी उपस्थित होते.

        उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना विदर्भ ही राष्ट्रसंत तुकडोजी, संत गाडगे बाबा अशा महान संतांच्या विचारांनी पावन झालेली भूमी आहे. तुम्हा-आम्हाला या विचारांचा प्रचार प्रसार करावयाचा आहे. त्यासाठी रा.से.यो. उत्तम माध्यम आहे, असे डॉ. संतोष कुटे यांनी सांगितले. जातीभेद, अंधश्रद्धा, व्यसन तसेच अनेक जाचक रुढींवर गाडगेबाबांनी जे ताशेरे ओढले त्यामागील मर्म आपण समजून घेतले पाहिजे, असे आवाहनही डॉ. कुटे यांनी केले. सरपंचपती श्री. दिपक पवार यांनी मनोगत व्यक्त करताना पिंपळगाव (चि.) ग्रामपंचायतने अनेक उपक्रम राबवून पुरस्कार मिळवले आहेत यामध्ये महाविद्यालयाच्या रा.से.यो. विभागाचे भरपूर सहकार्य लाभले आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी रा.से.यो. ही विद्यार्थी घडविणारी कार्यशाळा असते. असे प्रतिपादन केले. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्यदेखील राष्ट्रीय सेवा योजना सातत्याने करीत असते, अशी माहिती प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी दिली.
दिनांक ०४ जानेवारी ते ११ जानेवारी, २०२० दरम्यान आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरादरम्यान शोषखड्डे, नालेसफाई, परिसर स्वच्छता या उपक्रमांसह विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक सत्र व ग्रामस्थांसाठी सायंकालीन सत्रामध्ये समाजप्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. शिवाय रक्तदान शिबिराचेही आयोजन केले जाणार आहे. उन्नत भारत सर्वेक्षण अभियान हा उपक्रमदेखील शिबिरार्थीद्वारा राबविला जाणार आहे. शिबिर उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी प्रा. मधुकर जाधव यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब काळे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार महिला कार्यक्रम अधिकारी डाॅ. रूपाली तेलगड यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक-स्वयंसेविका बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment