श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन संपन्न
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
कलावंताने नेहमी सर्जनशीलतेच्या शोधात राहावे. यामुळे आपल्यातील कलावंत जिवंत राहतो व कला उत्तरोत्तर विकसित होत जाते, असे प्रतिपादन मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी उपक्रम राबविणारे सिद्धहस्त सुलेखनकार गोपाल वाकोडे यांनी केले.
स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज जयंती अर्थात मराठी भाषा गौरव दिन निमित्त आयोजित 'नामवंत साहित्यिकांच्या कवितांचे सुलेखन सादरीकरण' या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. गजानन जाधव उपस्थित होते. कवी कुसुमाग्रज उपाख्य वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. महाविद्यालयामध्ये कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक सुलेखनकार गोपाल वाकोडे यांनी ते राबवित असलेल्या 'कवितांचे सुलेखन' या उपक्रमाविषयीची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डाॅ. गजानन जाधव यांनी आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना मराठी भाषेची स्थिती-गती सोदाहरण समजावून सांगितली. मायबोली असलेल्या मराठी भाषेची ख्याती जागतिक पातळीवर पोहचावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावे ही अपेक्षा प्राचार्य डाॅ गजानन जाधव यांनी व्यक्त केली. मराठी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निमित्त तयार केलेल्या ' माझी मातृभाषा माझा शब्द ' या भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सुलेखनकार गोपाल वाकोडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मराठी साहित्यविश्वातील नामवंत साहित्यिकांच्या कवितांचे सुलेखन केले. यामध्ये कुसुमाग्रज यांच्या 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा', डाॅ. आंबेडकर, काव्य, येणं जाणं, देवधर्म या कवितांसह बालकवी, सुरेश भट, नारायण सुर्वे, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, ना.धों. महानोर, यशवंत मनोहर आदी कवींच्या कवितांचा समावेश होता. मुखपृष्ठ रेखाटक प्राचार्य डाॅ. गजानन जाधव यांनीदेखील कुसुमाग्रज यांच्या स्वर या लोकप्रिय कवितेचे सुलेखन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. प्रिया झोरे या विद्यार्थिनीने केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मधुकर जाधव यांनी करून दिला. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment