Friday, February 14, 2020

वार्षिक स्नेहसंमेलन हे प्रतिभेला चालना देणारे व्यासपीठ -- केशव खटींग


श्री व्यंकटेश महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संपन्न
देऊळगाव राजा : प्रतिनधी
महाविद्यालयामध्ये होणारी वार्षिक स्नेहसंमेलने ही विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देणारी असतात, तेव्हा विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करावी, असे प्रतिपादन परभणी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ. केशव खटिंग यांनी केले. 
        स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयामध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारोह प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या समारोहासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ गजानन जाधव हे उपस्थित होते. दि. १४ व १५ फेब्रुवारी  रोजी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलनाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आई-वडिलांनी आपल्याकडून बाळगलेल्या अपेक्षा आपण ओझं न मानता त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन डाॅ. केशव खटींग यांनी मार्गदर्शनादरम्यान केले.  डाॅ. केशव खटिंग यांनी त्यांची महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरलेली पिपळाचं पान जसं 
उगवतानी लाल गं लाल गं तसे सखे तुझे गाल गं ही पिपळाचं पान ही प्रेम कविता सादर करुन उपस्थितांची मनं जिंकली. एका शेतक-याची होणारी पत्नी आपल्या प्रियकराच्या आठवणीत कशी रमते हे सांगताना कवी केशव खटींग यांनी आस लागली संसाराची मनी गं ही रानात राबतोय कुणबिनीचा धनी गं ही ग्रामीण वातावरणाचा स्पर्श असणारी कविता सादर केली.
तरुणांनी राजकारण्यांच्या हातचे कळसुत्री बाहुले न बनता एक सुज्ञ नागरिक म्हणून आपले हित जोपासावे हा संदेश देणारी ...गल्लोगल्ली नेते झाले, घरोघरी झेंडे बारमाही हातामधी दुश्मनीचे धोंडे  राजावानी रानामधी राबायचं आपल्या कशासाठी कुणापुढे घोळायचे गोंडे 'झेंडा कोणाचा धरायचा नाय' ही कविता सादर केली.  कासवी ओल, सावित्री अशा सामाजिक आशयाच्या अनेक कविता सादर करून केशव खटींग यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधित केले. 
      अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डाॅ. गजानन जाधव यांनी युवा पिढीच्या अंगभूत गुणांना न्याय मिळावा तसेच त्यांच्यातील सर्जनशीलता परिपक्व व्हावी यासाठी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन केले. स्नेहसंमेलन वा इतर सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा परंतु कर्तव्यापासून ढळू नये, असे आवाहन केले.
या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाणिज्य विभागप्रमुख डाॅ. नरेंद्र शेगोकार, इतिहास विभागप्रमुख डाॅ. राजेंद्रसिंग देवरे, वनस्पतीशास्त्र विभागातील डाॅ. महेंद्र साळवे यांना आचार्य पदवी संपादित केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. 
नवी दिल्ली येथे आयोजित थलसैनिक कॅम्पमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करून कलरकोट प्राप्त केलेला एन.सी.सी. कॅडेट ओम समाधान क॔काळ याच्यासह क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवणा-या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० च्या परीक्षेत  एम.ए. मराठी  या विषयात गुणवत्ता यादीत स्थान पटकावल्याबद्दल कु. रोहिणी दोडके हिचादेखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. विविध वर्गामध्ये व विषयामध्ये प्राविण्य मिळवणा-या गुणवंत विद्यार्थ्यांना एकुण ४५३०८  रूपयांची रोख पारितोषिके व प्रमाणपत्र वितरित करून प्रोत्साहित करण्यात आले. या उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर जाधव यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. सौ. एम.एस. मुळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी संसद विभाग व वार्षिक स्नेहसंमेलन समिती प्रमुख डाॅ. सुधीर चव्हाण यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. निलेश काकडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 comment: