तरुण सागरमहाराजांचे देऊळगाव राजात आठ दिवस होते वास्तव्य
देऊळगावराजा : (प्रतिनिधी) संतमुनी तरुण सागर महाराज यांच्या निधनाची वार्ता कळताच देऊळगाव राजा नगरीला धक्का बसला. तरुण सागर महाराज यांचे सन २००८ मध्ये येथे आगमण झाले होते. आठ दिवसांचे त्यांचे वास्तव्य आणि तीन दिवसांचा सत्संग, प्रवचन यामुळे बालाजी नगरी अक्षरश: भारावून गेली होती. तरुण सागर महाराजांचा तीन दिवसांचा सत्संग आणि पाच दिवसांचा मुक्काम पहिल्यांदाच तालुकास्तरावर झाला होता. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच बालाजी नगरीत त्यांच्या वास्तव्याच्या आठवणी ताज्या झाल्या.
तरुण सागर महाराज हे आपल्या मधुर वाणीने व कडव्या बोलीने अखंड जगात कडवे प्रवचक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते केवळ जैनांचेच श्रद्धास्थान नव्हते तर सर्वच धमीर्यांना दिशा देणारे संतमुनी त्यांच्याकडे पाहिले जायचे. १ सप्टेंबर रोजी त्यांची त्यांनी देह त्यागला. सन २००८ मध्ये ते औरंगाबदला आले होते. येथे चातुर्मास (वषार्योग) पार पडल्यानंतर ते जालना मार्गे परभणीकडे जाणार असल्याची माहिती देऊळगाव राजा येथील सकल जैन समाजाला मिळाली असता जैन समाजबांधवांनी औरंगाबाद येथे जाऊन मुनींच्या चरणी श्रीफल अर्पण करत त्यांना देऊळगाव राजा येथे येण्याची विनंती केली. त्यांनी समाजाची गुरुभक्ती पाहून होकार दिला. मुनींच्या आयुष्यात जिल्हास्तर सोडून प्रथमच तालुका स्तरावर कडवे प्रवचन करण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. दि. ४ डिसेंबर २००८ रोजी त्यांचे बालाजी नगरी देऊळगाव राजा येथे आगमण झाले. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर हे स्वत: मुनींच्या स्वागताकरिता शहरात आले होते. यावेळी दि. ६ ते ८ डिसेंबर २००८ असे तीन दिवस त्यांचे कडवे प्रवचन आणि सत्संग पार पडला. यावेळी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. शहरासह पंचक्रोषीतीलच नव्हे तर जिल्ह्यातील व लगतच्या जिल्ह्यातील जैन समाजासह सर्वच समाजबांधव या प्रवचनासाठी बालाजी नगरीत दाखल झाले होते. तेव्हा भाविकांना तरुण सागर महाराजांना वयाच्या पस्तीशीमध्ये प्रवचन देतांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला होता. त्यांच्या शहरातील ८ दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी सकल दिगंबर जैन समाजाची गुरुभक्ती अनुभवली. या नगरीतून त्यांचे विहार झाल्यानंतर ते ज्याही शहरांमध्ये गेले तेथे त्यांनी देऊळगाव राजा नगरीतील गुरुभक्तीचा आर्वजून उल्लेख केला होता. बालाजी नगरीत त्यांनी गुरु परिवाराची स्थापना केली होती. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात पोहचता गुरुभक्तांना धक्का बसला.



No comments:
Post a Comment