Thursday, September 13, 2018

पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे जल्लोषात स्वागत


शहरात चौका चौकात आणि घरो घरी गणरायाची स्थापना
 देऊळगावराजा : (प्रशांत पंडित) 
            ढोल- ताशासारख्या पारंपारिक वाद्यांचा गजर, लेझिम, झांजपथकांचा निनाद, दुसरीकडे बँड, बेंजो आणि सनईचे सूर, गणपती बाप्पा मोरया  गजर, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगार ल्यालेल्या महिला, मुली; पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्नांचा दरवळ, खीर-मोदकांच्या प्रसादाचा थाट अशा थाटात गुरुवारी श्री गणरायाचे आगमन झाले.     
       

            शहरातील शिवद्वार चौक, चौंडेश्वरी मंदिर परिसर, महाद्वार चौक, जुनी नगर पालिका, बालाजी फरस, जुना जालना रोड, चिखली रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी गणपतीची स्तुती करणाºया गीतांनी सांयकाळी सुरू झाली. दारात इंद्रधनुषी रंगांनी सजलेल्या रांगोळीचा गालिचा, घरादाराची साफसफाई झाल्यानंतर महिला श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी गव्हाची खीर, मोदकासह पंचपक्वान्नांचा नैवेद्य करण्यात गुंतल्या. बालचमू पारंपरिक वेशात सजून घरातील पुरुषांना व मोठ्यांना गणपतीच्या सजावटीसाठी मदत करीत होते. वृद्ध माणसे प्रत्येक कामात सहकार्य करीत होती. एकीकडे घराघरांत ही लगबग सुरू असताना दुसरीकडे आपला देव घरी आणण्यासाठी आलेल्या भाविकांनी शहरातील बाजार पेठेत गदीर्ने फुलून गेले होते. फक्त शहरातीलच नव्हे तर  आसपासच्या गावांतूनही अनेक नागरिक बाजार पेठेतून गणेश मूर्ती नेत होते.
लहान मुले, मुली, वयस्कर माणसे, महिला अशा कुटुंबासह आलेले भाविक फटाक्यांची आतषबाजी, बॅँड-बाजा, ढोल-ताशा पथक, सनईच्या सुरावटीच्या साथीने आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर करीत श्री गणेशाची मूर्ती नेत होते. पायी चालत श्री गणेशाला घरी नेतानाच अनेकांनी फुलांच्या माळांनी सजविलेली हातगाडी, रिक्षा, चारचाकी अशा वाहनांतून बाप्पांची स्वारी घरी आणली. फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर दारात उभारलेल्या सुवासिनींनी श्री गणरायाची दृष्ट काढत त्याचे औक्षण केले. रात्र-रात्र जागून खास बाप्पांसाठी तयार केलेल्या आराशीमध्ये बाप्पांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. पाच फळांची मांडणी, सुवासिक धूप-दीपाचा दरवळ, आरतीचे ताट, समईचा मंद प्रकाश, अभिषेक, प्रसाद, समोर पक्वान्नांचा नैवेद्य अशा थाटामाटात श्री गणेशाची पहिली आरती करण्यात आली. नगर पालिकेने बाप्पांच्या प्रवासाच्या मार्गांची डागडुजी केली. मनोरंजन, प्रबोधन, कार्यक्रमाची १० दिवस रेलचेल या काळात सुरू राहील. 


   

No comments:

Post a Comment