Tuesday, September 18, 2018

"रावणा राजा राक्षसाचा"

  मराठी साहित्याचा दर्जा उंचावणारी कादंबरी
 साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस 
        चार वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ‘‘रावण राजा राक्षसांचा’’ ही मराठी कादंबरी वाचकांना वाचण्यासाठी उपलब्ध झाली. हे सांगतांना मला खुप आनंद होत आहे. पुस्तकाविषयी खुप काही लिहिण्याची माझी इच्छा आहे, ते मी लिहीतच राहील. तुर्तास त्या लेख मालिकेतील ही पहिली माळ...सुरूवातीलाच नमूद करू इच्छितो की, ही समीक्षा नाही, तर आजवरच्या माझ्या थोड्याफार वाचनाच्या व आकलनाच्या पुंजीवर दिलेली ही प्रतिक्रिया आहे. कादंबरी निर्मितीपासूनच याचा मी भाग होतो व सर्वात पहिला वाचक हे सर्व त्यातूनच येत आहे. 
        आधुनिक मराठी वाङमयाच्या इतिहासात आरंभ काळापासूनच कादंबरी या साहित्य प्रकाराने भर घातली आहे.या  क्षेत्रातील आशय व अभिव्यक्ती यांच्यातील स्थित्यंतराचा मला परामर्ष घ्यायचा नाहीे तर गोंधळलेल्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक  अवकाशात शरद तांदळें सारखे तरुण लेखक आपली प्रेरणा कुठे शोधतात हे मला पहायचे आहे. ‘‘रावणाला रामायणातून मुक्त केल्याबद्दल’’ वाचक म्हणून शरद यांचे आभार मानतो. पौराणिक साहित्यात वाचकाला पात्राच्या अंतरंगात डोकावता येत नाही, मात्र पौराणिक फिक्शन च्या स्वरुपात कथानकातील तपशील वाचकांच्या डोळयांसमोर उभे राहतात. तपशीलाच्या आधारे दुसरी बाजू समजून घेतली जाते.या विचारातून ‘‘रावण राजा राक्षसांचा’’ या कादंबरीचा प्रवास सुरू होतो. 
           रावण कादंबरी काशविषयी आहे, तर रावण या शब्दातील वलय काय आहे हे जाणून घेण्यासाठी.... रावण कोण होता? ‘‘रक्षो रक्षिता राक्षस’’ चं ब्रीद उराशी बाळगत राक्षस संस्कृतिचा पाया घालणारा, सावत्र बहिणीच्या अपमानासाठी सर्वस्व पणाला लावणारा, 64 कला, 14 विद्या जाणणारा, रावणसंहिता, कुमारतंत्र यासारखे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहीणारा,कलाप्रेमी रुद्रविणा व बुद्धीबळाचा निर्मिती करणारा शिवतांडव स्त्रोत लिहिणारा शिवभक्त असा इतिहासात दुर्लक्षित राहीलेल्या "महानायकची" गोष्ट आहे. या कादंबरीच्या वाचनातून ‘‘वैचारीक स्पंदने’’ तयार व्हावीत. लोकांनी पुस्तकावर बोलावं व स्वतः रावणाला भेटावं यासाठीचा हा प्रयोग. साहित्यकृतीचे महत्व त्या काय उत्तरे देतात हे नसून अस्वस्थ करणारे कोणते प्रश्‍न त्या उपस्थित करतात यात असते. समकालीन, सामाजिक वास्तवामधे काही समस्या आहेत.या समस्यांवर भाष्य करण्यासाठी 'रावण' कथेचा प्रतिकात्मक वापर करून मानवी व्यवहार व विचारांवर प्रकाश टाकण्याचे काम शरद तांदळे यांची ‘‘रावण राजा राक्षसांचा’’ ही कादंबरी करते. 
"बुद्धिच्या आणि समतेच्या मूल्यांवर वर्गवारी करावी व जन्मापासून सुरू होणारी समानता कशा प्रकारची असावी’’ असे बिभिषन व रावणाचे संवाद असो... वा ‘‘ज्या धर्माच्या धारणा काळानुरुप बदलत नाही, तो धर्म गुलामांची फौज तयार करतो’’ हे धर्म  या संकल्पनेवर रावणाचे संवाद वाचकाच्या संवेदना जागे करणारे ठरतात. वाचक  म्हणून  मला कादंबरीतील आवडलेली जागा म्हणजे स्त्रीयांचे अधोरेखित केलेले महत्त्व. कादंबरीत येणार प्रत्येक  स्त्री पात्र 'कैकसी' असो वा 'मंदोदरी' असो तिला स्वतःचे अस्तित्व आहे. त्यांना  स्वतःच  मत आहे. या स्रिया प्रतिक्रिया देतात.या  प्रतिक्रियांना ग्राहय धरले जाते. सांस्कृतिक लढ्याची जाण असणारी त्राटीका, युद्धनीती आखते व रावणाला मार्गदर्शन करते. "स्रियांना शस्र  ज्ञानाची गरज काय"? या बिभीषणाच्या प्रश्‍नावर रावणाचं लंकिनीला सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करणं सार्थ वाटतं. तसेच कुम्भिसीनीचा पति निवडीचा अधिकार यांसारख्या  प्रसंगातून स्त्री च्या जाणीव आणि नेणिवेचा विचार करत अखंड सामाजिक अस्तित्व अधोरेखित होते. 
            "मी मरणार नाही" ची घोषणा देणारा रावण  रणांगणात कोणालाही मृत्यु यायला  नको, असे सांगतो तेव्हा साम्राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या  विचार त्याला "महानायक" बनवतो. ‘‘रावण राजा राक्षसांचा’’ व इतर पौराणिक कादंबरी लिखाणातील महत्वपूर्ण फरक म्हणजे इतर पौराणिक कादंबरीत आशय व अभिव्यक्तीचा विचार करता आशयाचा  अभाव भरून काढणसाठी वास्तव भाषेहून वेगळी संस्कृत प्रचुर अलंकारिक भाषा वापरली जाते. परंतु रावण कादंबरीत साधी-सोपी, ओघावती भाषा व बोलींच्या मिश्रणातून एक स्वतंत्र भाषाशैली आकारास येते. ‘‘स्थल-काल व अवकाश’’ याचे संयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने कादंबरीत मांडले आहे. देश कुठला? कालखंड कोणता?वेळ कुठली? या  प्रश्‍नांची उत्तरे वाचकाला सहज मिळत जातात व कादंबरी प्रवाही होते. ‘‘ऐतिहासिक कालक्रम‘’आणि ‘‘वैयक्तिक आयुष्यक्रम" यांची सांगड घालणे कादंबरीकारा समोर मोठे आव्हानच असते. हे अतिशय योग्य  पद्धतीने समजून घेत ‘‘रावणाच्या चरित्र काळाची गती’’ वाचकाला कोठेही मंदावताना दिसत नाही. "आत्मज्ञान आलं तरी ज्ञानप्रकियेशी जोडला गेलेला रावण’’ स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आधार शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतो. दिवाणखान्यातील प्रसंग, स्वतःशी रावणाचे संभाषण यातुन रावणाचे स्व शी निर्माण होणारे नाते उलघडत जाते. हा स्व चा शोध वाचकाला आपल्या " खऱ्याखुऱ्या स्व शी’’ जोडून घ्यायला मदत करतो. 
"अमूर्त जगाचं आकलन" करत अमूर्त विश्‍व मूर्त करणं कादंबरीत खुप समर्पक पद्धतीने मांडले आहे. बोली, नद्या, पोषाखपद्धती, वनस्पती  कादंबरीत सतत भेटत राहतात. विशेष प्रयत्न न करता अमूर्त जगाचा उपयोग कादंबरीतील घटना घडण्यासाठी होतो. एक पात्र म्हणून येणारा 'निसर्ग'साकारण्यात  लेखक यशस्वी ठरतात. कादंबरीत  येत राहणारे मांसाचे वास, फुलांचे निरनिराळे सुगंध, सूक्ष्म हालचालींचे वर्णन. शंख, दुदंभी सारखे वाद्यांचे संदर्भ,  समग्र राष्ट्राच्या प्रकृतिचे सूक्ष्म बदल यातून वाचकाचं आकलन अधिक समृद्ध होत जातं. 
वाचक म्हणून कादंबरीत आवडलेले पात्र म्हणजे ‘‘प्रहस्त’’ आजर्पंतच रामायणावरील वाचनात अतिशय दुर्बळ, छोटछोट्या निर्णयासाठी रावणाची परवानगी घेणारा वेडसर सेनाप्रमुख म्हणून प्रहस्त येत राहीला, मात्र इतका निर्भिड युद्धनीती आखणारा जागरुक, कर्तव्यदक्ष प्रहस्थासारखा सेनाप्रमुखच रावण सम्राटाच्या राज्याचं रक्षण करू शकतो हे कादंबरी वाचनानंतर आपण ठामपणे सांगू शकतो. रावण या प्रमुख पात्राबरोबर इतरही व्यक्तीरेखा महत्त्वपूर्ण ठरतात. जसे रणांगणातील पिछेहाट जिव्हारी लागलेले वयस्क तरी विचारांनी तरुण असणारे 'सुमाली आजोबा’.शस्त्रांची भाषा इतर भाषांपेक्षा प्रभावी असते असं माणणारा ‘महोदर’, दिर्घायुष्याचा आशिर्वाद काय कामाचा? असे सांगणारा ‘कुंभकर्ण’. बंदीस्त आयुष्य जगत मुलांच्या रुपात मुक्ती शोधणारी, वडिलांच्या प्रतिक्षेत असणारी रावणाची आई ‘कैकसी’ अशी सर्व पात्रे रावणाला पुरक म्हणून न येता स्वतंत्रपणे समोर येतात. अशा व्यक्तीरेखांच्या चित्रणातून प्रचंड अर्थपूर्ण विचारविश्‍व तयार होते. आजर्पंतच्या आपल्या 'प्रस्थापित मानसिकतेला' म्हणजेच, ऋषिंचे आश्रम  उध्वस्त करणारा, निष्पापांची हत्या करणारा, सितेला पळविणारा, दुष्ट रावण—या पूर्वग्रह ला तडे जाण्याची शक्यता आहे. नाहीतरी दुसरी बाजू समजून न घेता एखादा विचार पूर्ण कसा होऊ शकेल? लेखक म्हणून शरद तांदळे यांच्या लेखनाची बलस्थानं पहायची  म्हंटलं तर समाज समजून घेण्याची त्यांची सर्वंकष मुलभूत प्रवृत्ती, एकात्म विचार करणारं लेखन, सामाजिक संरचनांचं विश्‍लेषण करण्याची पद्धत, मानवी वृत्ती प्रवृत्तींचा मुलभूत शोध घेण्याची धारणा, सिद्धांकन व व्यवहारातील अडचणींचे विश्‍लेषण, या असंख्य लेखन वैशिष्ट्यांमुळे त्यांचे लिखाण मराठी कादंबरी लेखनातील महत्त्वाचा उद्गार ठरेल. आधीच्या  पिढीने दिलेला बुद्धिचा अवकाश स्विकारत जनतेला व संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला वैचारिक स्वातंत्र्याची मोकळीक देणारा रावण व ‘रावण राजा राक्षसांचा’ ही ‘‘तीव्र आत्मभान’’ असणारी कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडेल. 
                                                                 आपलाच,
                                                               हेमंत तांदळे

1 comment:

  1. खूप छान अभिप्राय आहे .... मी तुमच्याशी सहमत आहे ....👌👌👌

    ReplyDelete