Monday, September 3, 2018

संस्थापक अध्यक्षांचे योगदान अलौकिक : डॉ. संतोष ठाकरे

 
देऊळगावराजा : (प्रतिनिधी) दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीकडून नेहमी विधायक कार्य घडतात. अशीच डोळस दृष्टी लाभलेल्या श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. राजे राजेंद्रसिंह जाधव यांचे शैक्षणिक योगदान अलौकिक आहे, असे प्रतिपादन मूर्तिजापूर येथील श्री गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य व ख्यातनाम वक्ते डॉ. संतोष ठाकरे यांनी केले. संस्थापक अध्यक्ष के राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त स्त्री-पुरुष समानता काळाची गरज या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद््घाटन समारोह प्रसंगी उद््घाटक म्हणून ते बोलत होते.
      कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव हे उपस्थित होते. या महाविद्यालयाला ऐतिहासिक वारसा लाभला असून संस्थापक अध्यक्षांच्या प्रेरणेने व विद्यमान अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांच्या यथोचित मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी अथक परिश्रम घेऊन महाविद्यालयाचा सर्वतोपरी विकास साधण्याचा जो यशस्वी प्रयत्न केला आहे तो अभिनंदनास पात्र आहे, असे मत उद्घाटकांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य गजानन जाधव म्हणाले की, संस्थापक अध्यक्षांनी महाविद्यालयाची स्थापना करून विद्यार्थी घडवण्याचा व त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा जो वसा घेतला तो वारसा आम्ही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन चालवत आहोत. ही आमच्यासाठी आनंददायी बाब आहे सांगितले. तर डॉ. एकनाथ भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले. स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम विभागाच्या वतीने बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर रांगोळी स्पर्धा तर स्त्री-पुरुष समानता काळाची गरज या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत ४२ विद्यार्थ्यांनी, वक्तृत्व स्पर्धेत ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेत बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या पूजा खुपसे हिने तर वक्तृत्व स्पर्धेत बी. एस्सी प्रथम वर्षाच्या भारती चौधरी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. रासेयो विभाग व एनसीसी विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब काळे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्रा. नीलेश काकडे व प्रा. गजानन खांडेभराड यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक व एनसीसी कॅडेट्स अशा १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा. मधुकर जाधव, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. काळे, एनसीसी अधिकारी डॉ. अनंत आवटी, रासेयो क्षेत्रीय समन्वयक डॉ. विनोद बंसिले यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

 

No comments:

Post a Comment