Sunday, September 16, 2018

कोवळ्या चिमकुलीच्या अब्रूचे लचके आणि तू उचलेलं धाडसी पाऊल


        राहुल पहुरकर 
       शनिवारी दुपारी घरून अचानक माझी पत्नी योगिताचा फोन आला, नेहमी प्रमाणे मी लगेच तो रिसिव्ह केला, मात्र  मंत्रालयात एका कामात व्यस्त असल्याने, ' अगं काय झाले, काही अर्जेंट असेल तर पटकन सांग नाही तर नंतर बोलूयात आपण,'  असे नेहमीच्या स्टाईलमधे पत्नी योगीताला सांगितले. मात्र तिचा धीरगंभीर आवाज काही तर घडलंय याची कल्पना देत होता.  नंतर तिने मला जे काही सांगायला सुरुवात केली, तेव्हा मन सुन्न झाले. क्षणभर काही सुचलंच नाही.  कान जणू काही बधीर झाले होते....
           खरंच एक माणूस किती सैतान, विकृत असू शकतो, हे योगिताने सांगितलेल्या घटनेतून जाणवले.  काही क्षणात डोक्यात विचारांचा हलकल्लोळ सुरू झाला. काळजाला चटका बसला.  दुसरीकडे पिडीत निरागस चिमुकलीचा भेदरलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसत होता, तिचं करून रुंदन जणू मला व्यथित करत होतं.  योगिताने एका चिकमुल्या मुलीसोबत जन्मदात्याने अत्याचार केल्याची माहिती मला दिली.  पीडित मुलीच्या आईनेच पोटच्या पोरीसोबत घडलेला घृणास्पद आणि अंगावर काटे आणणारा प्रकार योगिताला सांगितला. तोच ती मला कथन करून सांगत होती, आणि त्या चिमुकल्या कळीचा निरागस, निष्पाप आणि हतबल चेहरा जणू माझ्या डोळ्यासमोर तराळत. आपण स्वतः एक बाप आहोत. आपली लाडकी चिमुकली आपल्या अंगाखांद्यावर खेळत असते. माझा बाप माझ्यासाठी सर्वस्व पाठीराखा अशी भावना मुलीच्या मनात असते. पण ही घटना नात्याला काळिमा फासणारी, आणि काळजाला खोलवर वेदना देणारी होती. माझ्या पत्नीने न डगमगता यावेळी घेतलेली भूमिका खरंच जिजाऊच्या शिकवणीची साक्ष देणारी आहे. आमच्याकडे घरकाम करणारी एक महिला आहे. तिला नऊ वर्ष वयाची एक मुलगी आणि दोन लहान मुले आहेत. ही महिला लोकांच्या घरी धुणी भांडी  करून आपला व मुलांचा उदरनिर्वाह चालविते. अत्यंत गरीब परिस्थितीत ही महिला जगत आहे. तिचा  नवरा दिवसभर दारू आणि गांजा पिऊन नशेत असतो. पती व्यसनाधीन असला तरी  बिचारी ही महिला मोल मजुरी करुन  मुलगी व मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण देत आहे.  दिवसभर मुलांना घरी एकटे सोडून ती लोकांच्या घरी घरकामाला जात असते, आजही नेहमी प्रमाणे सुनंदा (काल्पनिक नाव) माझ्या घरी कामावर आली. नेहमी बोलकी असणारी सुनंदा आज काम करत असताना मात्र भेदरलेली आणि अस्वस्थ दिसली.  तेव्हा राहवलं नाही म्हणून योगीताने आस्थेने तिला विचारले, ' काय ग काय झालंय, आज खूप शांत दिसतेस, बरं नाही काय,  नवऱ्या सोबत भांडण झाले का ? तुला त्याने मारले का? असे म्हणताच सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले आणि  तिने हंबरडाच फोडला. त्यानंतर तिने पोटच्या पोरीसोबत घडलेल्या अत्याचाराची कहाणी सांगण्यास सुरवात केली, ती कुणाच्याही मनाला आणि मेंदूला अस्वस्थ करणारी होती...सुनंदा माझ्या बायकोला ताई म्हणते ....ताई माझ्या नऊ वर्षाच्या लहान मुलीवर माझा नवरा गेले कित्येक दिवस झाले अत्याचार करतोय,  मी घराबाहेर पडली की , तो  तिला घरात कोंडून तिच्यावर अतिप्रसंग करतो तिच्या गुप्तांगासोबत खेळतो असं बरंच काही एकदमच नरकयातने सारखं रडत रडत ती योगीताला सांगत होती. पुढे सुनंदा एकेक गोष्ट दबक्या व भेदरलेल्या आवजात सांगत होती आणि माझी बायको हे सर्व सुन्न होऊन ऐकत होती. खूप दिवसापासून हा घृणास्पद प्रकार सुरू आहे. आज तर त्याने माझ्या चिमुकलीला खूप त्रास दिला, तिच्यावर पाशवी अत्याचार केला. माझी मुलगी तापाने फणफणत आहे, तिला खूप त्रास होत आहे. मी आता तीला हनुमान मंदिरावर लपवून आलीे. ताई मी पोलिसात तक्रार दिली तर तो मला व माझ्या मुलांना मारून टाकेल,  काय करू, कुठे जाऊ काही सुचत नाही आहे?? असे सांगत सुनंदा हायमोकलून रडू लागली. माझी पत्नी योगीताने तिला प्यायला पाणी दिलं, जवळ घेत  धीर दिला. घाबरू नको मी तुझा सोबत आहे, आपण मार्ग काढू असे म्हणत तिला शांत केले. लगेचच मला कॉल केला पण त्यावेळी मात्र माझा कॉल लागला नाही मग माझ्या लहान भावा प्रमाणे असणारा पत्रकार अमोल गावंडे याला योगीताने तात्काळ कॉल केला. अमोल आणि त्याचे काही सहकारी धावून आले आणि मग अमोल याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पोलीस स्टेशन सोबत संपर्क केला. थोड्याच वेळात पोलीसांनी चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम सैतानी वृत्तीच्या आणि विकृत मानसिकतेच्या बापाला ताब्यात घेतले...अन त्या चिमुकल्या मुलीची नरकयातनेतून मुक्ती झाली. उद्या न्यायालयात नराधमाला शिक्षा होईलच मात्र आज त्याला पोलिसात देण्यासाठी माझी पत्नी योगीताने पुढाकार घेऊन नारीशक्ती आणि मातृशक्तीचा प्रत्यय आणून दिला आहे. या संपूर्ण घटनाक्रमात एक महिल, जागरूक नागरिक योगीताने धाडस दाखवत योग्य पाऊल उचलले. परिस्थितीसमोर हतबल महिलेला धीर आणि एका पीडित मुलीला न्याय मिळवून दिला, हे कार्य लाखमोलाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल !  नेमकी हीच जाणीव  हतबल महिलेला योगीताने करून दिली. तिच्या मुलीवर वर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून देत अत्याचार विरुद्ध लढण्यासाठी बळ देऊन प्रवृत्त केले या गोष्टीचा मला खरंच आज खूप अभिमान वाटतोय. या घटनेतून एकच बोध मिळतो की, भविष्यात आपल्या आजू बाजूला घडणाऱ्या घटना फक्त बघून, ऐकून त्याकडे दुर्लक्ष करू नका तर अश्या लाचार ,दुर्बळ अत्याचारग्रस्त लोकांना आधार द्या आणि हिंमतीने समोर आणून लढण्याचे बळ द्या. कारण तुम्ही उचलले धाडसी पाऊल कुणाचे आयुष्य वाचवू शकते अश्या असंख्य चिमुरड्या निर्भया तुमच्याही आजूबाजूला आज ही कुचकरल्या जातायेत त्यांना उध्वस्त होण्याअगोदर बळ द्या. आता जन्म देणारा सैतान घरातही निर्माण झालाय आणि तोच कोवळ्या अब्रूचे लचके तोडतोय. तेव्हा अश्या लचके तोडणाऱ्या जबड्यात हात घालून दात मोजायचे नसतात तर असे विषारी दात उखडून फेकायचे असतात हे या मातृतीर्थ जिजाऊच्या जिल्ह्यातील लेक म्हणून योगिता तू तुझ्या धाडसी कर्तृत्वाने सिद्ध केलंय. खरंच तुला मानाचा मुजरा!

!! जय मातृशक्ती!!!

No comments:

Post a Comment