Monday, October 1, 2018

खडका शिवार खून प्रकरण..!!

आरोपी पकडण्यात पोलिसांना यश..
स्थानिक गुन्हा शाखेची कार्यवाही…
देऊळगांवराजा : (प्रतिनिधी)      
       तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशन परिसरातील खडका या उजाड गावाच्या हद्दीत झालेल्या हत्याकांडाचा तपास लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या पथकाला यश आले असून या दुहेरी हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या. स्थानिक गुन्हा शाखेचे प्रमुख महेंद्र देशमुख व पथकाचा पोलीस दलातर्फे रोख पारितोषिक देवून सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.
       अंढेरा हद्दीत खडका उजाड या गावाच्या शिवारात २१ सप्टेंबर रोजी दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी शरीरावर व तोंडावर जबर मारहाण केली होती. फक्त एका आरोपीच्या हातावर मधुकर घोलप असे गोंधलेले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेने शासनाच्या इलेक्शन पोर्टलवरुन मधुकर घोलप नावाची यादी काढली. १३४ मधुकर घोलप महाराष्ट्रात आढळून आले. त्यानंतर तांत्रिक साधनांचा उपयोग करुन पोलिसांच्या तिन पथकांनी मृतकाची ओळख पटवली. ते मृतदेह मधुकर गोरोबा घोलप (४५) व परमेश्वर बबरुवान घोलप (४५) दोघेही राहणार सिंदी जवळगा ता. निलंगा जि. लातूर यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध सुरु केला असता आरोपींचा सुगावा लागला. शे. मुस्तफा उस्मान साब शेख (४०, रा. बिंदगीहाळ, ता. जि. लातूर ), मधुकर मारोती लहाने (२८, रा. राहेरी बु. ता. सिंदखेडराजा, जि.बुलढाणा) व संदीपान निवृत्ती पवळे (३४, रा. आनंदनगर, दापका, निलंगा) यास बिलासपूर (छत्तीसगड) येथून अटक केली.
                नेहमीच्या तक्रारींना कंटाळून केला खून
तिन्ही आरोपींना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. सदर गुन्ह्यातील मृतक मधुकर गोरोबा घोलप हे कै. सरस्वती शिंदे निवासी अपंग विद्यालय निलंगा येथे पहारेकरी म्हणून नोकरीस होते. त्यांचे १० वीचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र खोटे असल्याने शाळेचे संस्थाध्यक्ष गोरख शिंदे यांनी त्यांना कामावरुन कमी केले होते. त्याचा राग मनात धरुन मृतक मधुकर घोलप हे शाळेविरुद्ध समाजकल्याण विभाग लातूर येथे नेहनी तक्रारी करीत असत. त्यामुळे शाळेला व संस्थेला त्रास होत होता. तसेच त्याच शाळेत आरोपी संदीप निवृत्ती पवळे याने त्याचे राहते घर विकून त्याचा भाऊ हनुमंत यास ८ लाख रुपये डोनेशन भरुन नोकरीला लावले होते. परंतु मृतक मधुकर घोलप याच्या नेहमीच्या तक्रारीवरुन शाळेने आरोपी संदीप पवळेचा भाऊ हनुमंत यास कामावरुन काढून टाकले होते. मृतक मधुकर घोलप यांच्या नेहमीच्या तक्रार अर्जाच्या व चौकशीच्या त्रासाला कंटाळून संस्थाध्यक्ष गोरख शिंदे व आरोपी संदीप पवळे यांनी संगनमताने मधुकर घोलप याचा काटा काढला. त्यासाठी दोन्ही मृतकांना देवदर्शनाला जाण्याच्या बहाण्याने स्विफ्ट डिझायरमध्ये बसवून त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील ताडशिवनी फाट्याजवळ आणून त्यांना दारु पाजली. त्यानंतर जवळील नायलॉन दोरीने गळफास दिला आणि त्यांचे प्रेत अंढेरा हद्दीतील खडका उजाड गावातील शिवारात आणून फेकून दिले. त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांचा चेहरा दगडाने विद्रूप केला.

मृतकांची ओळख पटविणे व आरोपी शोधणे ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणाचे पोलीस निरिक्षक महेंद देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुनील जाधव, सपोनि सुनिल अंबुलकर, पोउपनि इम्रान इनामदार, प्रदीप आढाव, मुकूंद देशमुख, स.फौ. शेषराव अंभोरे, पो.हे.काँ. विकास खानजोडे, सुधाकर काळे, पो. ना. विलास काकड, रघुनाथ जाधव, गजानन आहेर, दीपक पवार, गजानन चतुर, पो. कॉ. अमोल तरमळे, सुजीत सोनार, विजय सोनोने, गणेश शेळके, केदार फाळके, संजय नागवे, चालक गजानन जाधव यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment