Sunday, October 28, 2018

देऊळगावराजा, चिखली दुष्काळग्रस्त जाहीर करा

आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची मागणी  
देऊळगावराजा ; (प्रतिनिधी) 
     पावसाअभावी देऊळगावराजा व चिखली तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. सोयाबीन व कपाशीचे हातचे आलेले पीक गेले. या तालुक्यात अशी भीषण परिस्थिती असल्याने देऊळगावराजा व चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
          निवेदनात नमूद आहे की, शासनाने नुकतीच दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली. त्यामध्ये दुर्दैवाने देऊळगावराजा व चिखली तालुक्याचा समावेश नाही. देऊळगावराजा तालुका हा मराठवाड्याला लागून आहे. सदैव मराठवाड्यासारखीच परिस्थिती दरवर्षी या तालुक्यात असते. सतत ३ ते ४ वर्षापासून हा तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. महत्वाकांक्षी असा खडकपूर्णा प्रकल्प देऊळगावराजा तालुक्यात असून मागील वर्षी सुद्धा अल्प पावसामुळे अल्पशा जिवंत साठा या धरणामध्ये होता. ६७ दलघमी मृत साठा असणाऱ्या या प्रकल्पात यावर्षी तर आजच्या स्थितीत केवळ ३१ दलघमी मृत साठा आहे. यावर्षी पावसाअभावी या दोन्ही तालुक्यातील सोयाबीन पीक पूर्णत: शेतकऱ्यांच्या हातचे निघून गेले. कपाशीची सुद्धा तीच अवस्था असून त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेला आहे. यंदा जनावरांना सुद्धा चारा व पाणी मिळणार नाही. अशी दुष्काळसदृश परिस्थिती असताना जिल्ह्यातील जे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले त्यामध्ये देऊळगावराजा व चिखली तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे हे दोन्ही तालुके त्वरित दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 

1 comment: