Thursday, October 11, 2018

घटस्थापनेच्या मुहूर्तावर बालाजीच्या सुवर्ण आभुषणांना झळाळी

वर्षातून दोनदा उजळविली जातात दागिने
दसऱ्यापासून यात्रोत्सवाला होणार प्रारंभ.
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
     प्रति तिरुपती बालाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालाजी महाराजांची पुरातन सुवर्ण आभुषणे घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुवर्णकारांनी चकाकून दिली. वर्षातून दोनवेळा दागिने उजळवून देण्याची चारशे वर्षांची परंपरा श्री बालाजी महाराज संस्थानने कायम ठेवली आहे. 
          या काळात भाविकांना 'श्रीं'च्या अंगावरील सर्व आभूषणे अगदी जवळून बघण्याचा योग येतो. बालाजी महाराजांचे मंदिर चारशे वर्षे जुने आहे. 'श्रीं'च्या अंगावरील सर्व सुवर्णअलंकार पुरातन असून शोभिवंत आहेत. सोन्याची बोरमाळ, पुतळी माळ, मोतीमाळ, हीरेजडीत पदक, रत्नजडीत कर्णफुले, सोन्याच्या पताका, छत्री, अष्टपैलू माळ, प्रभावळ, लक्ष्मीहार, मारवाडी हार, मारवाडी गोफ, कुहिरी हार, पवळ्याची माळ, सुवर्णांची १४ फुले, रत्नजडीत तोफ असे सर्व दागिने सुवर्णकारांनी उजळवून दिली. सुवर्णलंकार रामनवमी व घट स्थापनेच्या दिवशी शहरातील सर्वच सुवर्णकारांना देऊन उजळवून घेण्यात येतात. सुवर्णकारही आपले भाग्य म्हणून उत्साहाने काम करतात.यावेळी विजय दहिवाळ, चंद्रकांत वालेकर, उमेश शेंदुरकर, संजय दहिवाळ, सुनील काटकर, अनंत काटकर, अरुण वालेकर, गजानन खंदारकर उपस्थित होते..

No comments:

Post a Comment