Monday, November 12, 2018

भाऊबीज करुन परतत असताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघे ठार

देऊळगाव राजा - (प्रतिनिधी)
भाऊबीज आटोपून घरी येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. दुचाकी-आयशरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील आई-वडील व मुलगा अशा तिघांचा मृत्यू झाला. सदर घटना देऊळगाव राजा तालुक्यातील दे.राजा-चिखली मार्गावरील कुंभारी गावाजवळ शनिवारी ४ वाजता घडली.
     गुलाब मुख्यदल, अल्का मुख्यदल आणि आकाश मुख्यदल अशी मृतांची नावे आहेत. देऊळगाव राजातील उबरखेड येथील गुलाब नामदेव मुख्यदल यांनी ९ नोव्हेंबरला त्यांच्या पत्नी व मुलाला माहेरी बाहेगाव येथे भाऊबीजेसाठी सोडले होते. भाऊबीज आटोपल्यानंतर ११ नोव्हेंबरला शनिवारी ते आपली पत्नी व मुलाला घेण्याकरिता दुचाकी (एमएच २१ यु १११४) ने आले होते.  दरम्यान, उबरखेड येथे जाण्यासाठी ते शनिवारी ४ वाजता निघाले. काहीवेळानंतर दे.राजा-चिखली मार्गावरील कुंभारी गावाजवळ देऊळगावहुन चिखलीकडे येणाऱ्या आयशर (एमएच ०४, जी एच ६३३८) ने मुख्यदल यांच्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली. यामध्ये गुलाब मुख्यदल, अल्का मुख्यदल हे दोघेही जागीच ठार झाले, तर मुलगा आकाश मुख्यदल हा गंभीर जखमी झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविले. मात्र, जालन्याजवळ रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी आयशरच्या चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment