देऊळगाव राजा (अशरफ पटेल)
आपलं मस्तक सशक्त करण्यासाठी वाचन आवश्यक आहे जो अविरत वाचन करतो तो ज्ञानी होतो. माणसाची खरी श्रीमंती ही त्याच्या ज्ञानावरूनच सिद्ध होते, असे प्रतिपादन ख्यातनाम वक्ते व चोखासागर नामप्रवर्तक प्रा. कमलेश खिल्लारे यांनी केले. दत्तकग्राम पिंपळगाव (चिलमखां) येथे श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन समारोह प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव हे उपस्थित होते. अतिथी म्हणून पत्रकार श्री. सुरज गुप्ता, पिंपळगाव (चिलमखां) येथील सरपंचपती श्री. दिपक पवार, ज्येष्ठ पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य श्री. परमेश्वर खांडेभराड, श्री. संतोष जोशी, श्री. अशोक जाधव, श्री. सुनील खांडेभराड, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. भानुदास खांडेभराड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. प्रदीप हिवाळे, श्री. अंबादास खांडेभराड आदी उपस्थित होते.
युवाशक्ती ही कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते तेव्हा युवकांनी स्वतःला अशा पद्धतीने विकसित करावे की जेणे करून देशाचा नावलौकिक वाढेल, असे आवाहनही प्रा. खिल्लारे यांनी केले. समाजामध्ये अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, जातीयता अशा समस्या अजूनही मूळ धरून आहेत. या समस्यांचे समूळ उच्चाटन स्वयंसेवकांना करता येईल यासाठी रा.से.यो. पेक्षा दुसरे प्रभावी माध्यम नाही. समता प्रस्थापित करणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे या बाबी रा.से.यो. स्वयंसेवक उत्तम रीतीने करू शकतात असा आशावाद प्रा. कमलेश खिल्लारे यांनी व्यक्त केला. सरपंचपती श्री. दिपक पवार, ग्रामसेवक श्री. बी.यु. तिडके श्री. संतोष जोशी यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून रा.से.यो. पथक कार्य करीत असते, असे प्रतिपादन केले. जीवन जगण्याचा मूलमंत्र आपण शोधला पाहिजे, समाजाप्रति भान जपलं पाहिजे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना सातत्याने करीत असते, अशी माहिती प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी दिली.
दिनांक ७ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरादरम्यान शोषखड्डे, नालेसफाई, परिसर स्वच्छता या उपक्रमांसह विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक सत्र व ग्रामस्थांसाठी सायंकालीन सत्रामध्ये समाजप्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. शिवाय रक्तदान शिबिराचेही आयोजन केले जाणार आहे. शिबिर उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. मधुकर जाधव यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब काळे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार स्वयंसेवक प्रतिनिधी सौरभ जाधव याने व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, पत्रकार बंधू, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक-स्वयंसेविका बहुसंख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment