Saturday, January 5, 2019

देऊळगाव महीत उद्या अटल आरोग्य महाशिबिर


देऊळगाव मही : (प्रतिनिधी) 
            क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्टमाता जिजाऊ, संत चोखामेळा यांची जयंती व भगवान बाबा पुण्यतिथी असा योग साधून देऊळगाव मही येथे अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जानेवारी रोजी येथील शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा वैद्यकीय आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कांयदे यांनी केले आहे..
        गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचारासह आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियासवलती मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीे शिबिर परिसरात ओपीडी मार्फत तपासणी करण्यात येणार असून विविध पॅथीचे ५० हून अधिक डॉक्टर आपली सेवा देणार असल्याची माहिती डॉ. सुनील कायंदे यांनी दिली. अटल आरोग्य शिबिराच्या आयोजनाच्या आढावा बैठकीत शिबिराचे स्वयंसेवक, विविध समित्यांच्या प्रमुखांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या शिबिरात तपासणीनंतर रुग्णांना गरजेनुसार औषध वाटप केले जाणार असून सवलतीच्या दरात शस्त्रक्रीया देखील केली जाणार आहे. या शिबिराचे उद्घाटन ६ जानेवारीला सकाळी ११ वाजता विदर्भ वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष ना. चैनसुख संचेती यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आ. डॉ. संजय कुटे राहणार आहे. आ. आकाश फुंडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. प्रशांत राठोड, सचिन देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांच्यासह लोकप्रतिनिधींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या आरोग्य शिबिरात नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, जनरल सर्जरी, बालरोग, मूत्ररोग, कान - नाक -घसा, स्त्रीरोग, कर्करोग, दंतरोग, जनरल मेडिसीन, क्षयरोग, लट्ठपणा, मानसिक आरोग्य, जेनेटिक विकार आदींची तपासणी व उपचार केले जाणार असून रक्तदान शिबिर देखील होणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना गोपीनाथ मुंडे आरोग्य कार्ड देण्यात येणार असल्याचे डॉ. सुनील कांयदे यांनी सांगितले आहे.

1 comment: