श्री व्यंकटेश महाविद्यालयात योग शिबिर संपन्न
देऊळगांवराजा : प्रतिनिधी
सध्याचे युग हे धावपळीचे असून कामाच्या व्यापात आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. वेळ काढून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठी योग व प्राणायाम करावा कारण योग व प्राणायाम सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र मानला जातो असे प्रतिपादन जालना येथील पतंजली योग समिती व योग भूमी चे योगगुरू किशनजी डागा यांनी केले. श्री व्यंकटेश महाविद्यालयात आयोजित योग व प्राणायाम एकदिवसीय शिबिरामध्ये ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव उपस्थित होते. अतिथी म्हणून भगवान बाबा महाविद्यालय, सिंदखेड राजा येथील डॉ. गणेश दराडे, जालना येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. वाघ, श्री. घडसिंग उपस्थित होते.
शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित या एकदिवसीय शिबिरामध्ये योगगुरू डागा यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. पचनक्रिया सुधारण्यासाठी व गुडघे दुखीवर मात करण्यासाठी वज्रासन, मणक्याचे आजार, हृदय विकार यावर उपाय म्हणून उष्ट्रासन, शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त असलेले पर्वतासन आदी योगासनांची आवश्यकता व महत्व श्री. डागा यांनी पटवून दिले. कंठ सुधारणा व घशाच्या आजारावर मात करण्यासाठी उज्जै प्राणायाम, हृदय, फुफ्फुस, किडनी हे सुदृढ व निरोगी राहावे यासाठी भस्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम ई. प्राणायाम व स्मरण शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम अशा विविध प्राणायामाची प्रात्यक्षिकासह माहिती योग गुरूंनी दिली. या शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना काखेत कळसा व गावाला वळसा अशी भारतीयांची अवस्था झाली असून योग शिक्षण ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे हे आपण विसरलो आहोत, अशी खंत व्यक्त केली. योग आणि प्राणायाम ही सुखी व समाधानी जीवन जगण्याची गुरुकिल्ली असून आपण दररोज योगासने करून आपली प्रकृती उत्तम ठेवावी असे आवाहन अध्यक्ष महोदयांनी केले. योग व प्राणायाम शिबिर उदघाटन समारोहाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर जाधव यांनी केले. प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक डॉ.किरण मोगरकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.अरविंद कानावाटे यांनी केले. शिबिरामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment