Saturday, February 2, 2019

खडकपूर्णा धरणातून तातडीच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता मंत्रालयात विशेष बैठक :


देऊळगाव राजावासीयांची पाणी समस्या सुटणार
 देऊळगाव राजा :  प्रतिनिधी
       शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकपूर्णा धरणातील जलपातळी कमी होऊन केवळ मृतसाठा शिल्लक राहिल्याने गेल्या ४ महिन्यांपासून शहरवासीय पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने टंचाई निवारणार्थ १ कोटी ७० लक्ष रुपयांची योजना तयार करून मान्यतेसाठी शासनाकडे पाठविली. या योजनेच्या अभ्यासानंतर ३० जानेवारी रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.
          ३० मार्चपर्यंत काम पूर्ण करून योजनेद्वारे शहरवासीयांना पाणी पुरविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शहरासाठी २०१३ मध्ये खडकपूर्णा धरणावरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. संबंधित कंत्राटदार व जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मुख्य विहिरीची जागा परस्पर बदलून घेतली व अंदाजपत्रकात नमूद विहिरींची खोली कमी घेतल्याने या विहिरीमध्ये पाणी जमा होऊ शकले नाही. दिवसेंदिवस पाणी साठा कमी होत गेल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत चार महिन्यांपासून धरणामध्ये चर खोदून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. ही पाणी समस्या उग्ररुप धारण करणार असल्याने उपाययोजना म्हणून न.प. प्रशासनाने १ कोटी ७० लाख रुपये खर्चाची योजना तयार करून शासनाकडे पाठविली. आ.डॉ. शशीकांत खेडेकर व नगराध्यक्ष सुनीता शिंदे यांनी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी हा मुद्दा रेटून धरला. अखेर ३० जानेवारी रोजी मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अवर मुख्य सचिव्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीच्या पाणीपुरवठा योजनांना विशेष बाब म्हणून मान्यता देण्यासाठी सचिवस्तरीय स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी चर्चेअंती योजनेला मंजुरी देण्यात आली. २० फेब्रुवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून ३० मार्चपर्यंत या योजनेतून पाणीपुरवठा करावा, असे आदेश देण्यात आले आहे. बैठकीला नगराध्यक्षा सुनीता शिंदे, उपाध्यक्ष प्रवीण झोरे, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मनोज शेळके उपस्थित होते.

No comments:

Post a Comment