पत्रसंग्रह प्रदर्शन व मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी उपक्रमांचे आयोजन
देऊळगांव राजा : (प्रतिनिधी)
स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सिद्धहस्त सुलेखनकार गोपाल वाकोडे यांच्या लोकप्रिय अशा 'मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोबतच अक्षरमित्र प्रल्हाद कायंदे यांच्याकडील मान्यवर सुलेखनकारांच्या सुंदर हस्ताक्षरातील पत्रसंग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. पत्रसंग्रह प्रदर्शनाचे उद्घाटन सुलेखनकार गोपाल वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद कायंदे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ गजानन जाधव हे उपस्थित होते.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना गोपाल वाकोडे यांनी 'मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी' या उपक्रमाचा आजवरचा झालेला प्रवास विद्यार्थ्यांसमोर कथन केला. भांड्यावर नाव टाकण्यापासून रोजगाराचे माध्यम म्हणून सुरू झालेली ही वाटचाल आज महाराष्ट्रभर मला प्रसिद्धी मिळवून देत आहे याचा आनंद आहेच; परंतु या उपक्रमाच्या माध्यमातून मी माय मराठीची सेवा करू शकतो या कर्तव्यपूर्तीचे समाधान अधिक आहे, असे प्रतिपादन गोपाल वाकोडे यांनी केले. उपजतच सुलेखनाची देणगी लाभलेल्या गोपाल वाकोडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचा-यांसह विद्यार्थ्यांना मराठीतून स्वाक्षरी करण्याचे धडे दिले.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित अक्षरमित्र प्रल्हाद कायंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सध्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पत्रसंस्कृती लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी एकमेकांशी पत्रव्यवहार करणे निकडीचे झाले आहे, असे आवाहन केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य आदी क्षेत्रातील मान्यवरांचे व सुलेखनकारांचे पत्र संकलित करण्याचा व संग्रह करण्याचा छंद कसा जडला याबाबत श्री. कायंदे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डाॅ गजानन जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुसुमाग्रज यांचे योगदान मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड कसे ठरते याबाबत सोदाहरण माहिती दिली. पत्रसंग्रह प्रदर्शन व मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी अशा उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या चळवळीला गती मिळेल असा आशावाद प्राचार्य डाॅ गजानन जाधव यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. अनंत आवटी यांनी केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय प्रा मधुकर जाधव यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार डाॅ. सुधीर चव्हाण यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


Thank you....
ReplyDelete