आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांना शेतकऱ्यांनी दिला अल्टिमेटम, शेतकरी संतप्त
चिखली : प्रतिनिधी
खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी मराठवाड्यातील जालना, मंठा, परतूरसह इतर ९२ गावांना नेण्याचा घाट जलसंपदा मंत्री बबनराव लोणीकर यांनी घातला आहे. मराठवाड्यात पाणी जाण्यासाठी आजी माजी आमदार जबाबदार आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे एकनाथ थुट्टे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. खडकपूर्णा प्रकल्प विहिरीचे सुरू असलेल्या बांधकामाला आ. डॉ. खेडेकरांचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे सुरू असलेले विहिरीचे बांधकाम तत्काळ थांबवण्यात यावे, असा अल्टिमेटम आ. डॉ. खेडेकर यांना शेतकऱ्यांनी दिला आहे.
भाजप, शिवसेना सरकारने जालना जिल्ह्यातील ९२ गावांसाठी बेकायदेशीरपणे पाणीपुरवठा योजनेला मंजुरात दिली आहे. पोलिसांचा धाक दाखवत विहिरीचे खोदकाम सुरू आहे. त्या कामास आमदार खेडेकरांचा छुपा पाठिंबा असल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. तर बुलडाणा शहराला गरज नसताना खडकपूर्णा प्रकल्पातून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी त्यांच्या कार्यकाळात पाणी जाऊ दिले. या सर्व प्रकाराला आजी, माजी आमदार जबाबदार आहे. जाफराबाद तालुक्यातील प्रकल्पापासून २० किलोमीटर अंतरावर पाइपलाइनद्वारे शेतकरी अवैधरीत्या पाणी उपसा करत आहे. मुख्यमंत्री सिंदखेडराजा येथे विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले असता खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित असलेल्या सुरा, सरंबा, अंढेरा यासह १४ गावांना कालव्याद्वारे पाणी देण्याची मागणी आ. खेडेकर यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री यांनी तांत्रिक बाबीचा आढावा न घेता पाणी देणार असल्याचे जाहीर केले. प्रकल्प ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अजूनही मिळाला नाही. तांत्रिक अहवाल न मागता मुख्यमंत्र्यांनी कॅनॉलद्वारे पाणी देण्याची घोषणा केली. ही घोषणा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जुमला म्हणून पाहिले जात आहे. प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देऊळगावमही, किनगावराजा, मलकापूर पांग्रा, बीबी, साखरखेर्डा व खुद्द आजी, माजी आमदारांची गावे शेंदुर्जन व अंत्री खेडेकर या गावात भीषण पाणी टंचाई आहे. तरीसुद्धा जालना जिल्ह्याला पाणी नेण्याचा घाट मंत्र्यांकडून घातला जात आहे. या प्रकाराला सत्ताधारी पक्षाचे आ.डॉ. शशिकांत खेडेकर जबाबदार आहे. मधुकर शिंगणे व गणेश शिंगणे या तरुण शेतकऱ्यांनी २५ फेब्रुवारीपर्यंत सुरू असलेले बांधकाम बंद न झाल्यास जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ थुट्टे यांनी तहसीलदार दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यामुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा चिखलीतून पेट घेणार आहे.


No comments:
Post a Comment