गिरोली खुर्द येथील गोठ्याला लागलेली आग.
देऊळगावराजा : प्रतिनिधी
तालुक्यातील गिरोली खुर्द येथील तीन भावांच्या गोठ्याला आग लागली. या आगीत गोठ्यातील शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत तीनही भावाचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील गिरोली खुर्द येथील शेतकरी बापूराव नारायण गायकवाड, शंकर गायकवाड व साहेबराव गायकवाड या तीन भावांचे गोठे तुळजापूर रस्त्यावर आहेत. आज सायंकाळी एका गोठ्याला आग लागली. आगीने रौद्र रूप धारण करत शेजारच्या गोठ्यांना आपल्या कचाट्यात घेतले. या आगीत गोठ्यातील चारा, शेतीउपयोगी साहित्य, स्प्रिंकलरचे दोन संच, पेट्रोल पंप, फवारणी पंप, लाकडी अवजारे जळून खाक झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अागीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माहितीवरून नगर पालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत तीनही गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. तलाठी वाघ यांनी पंचनामा केला. या वेळी उद्धव म्हस्के, सुधाकर म्हस्के, शीतल झिने, सुरेश म्हस्के, सरपंच ज्ञानदेव म्हस्के यांची उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment