Thursday, March 14, 2019

महाविद्यालयाचे संस्कार जीवनभर ऊर्जा देणारे असतात - प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख


श्री व्यंकटेश महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ व माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
देऊळगांव राजा : (प्रतिनिधी)
       प्रत्येकाच्या जीवनात आई-वडील यांच्यासह गुरूंचे संस्कार महत्वपूर्ण असून महाविद्यालयीन शिक्षण घेताना मिळालेले संस्कार हे जीवनभर ऊर्जा देणारे असतात, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक आणि कला व विज्ञान महाविद्यालय, कुर्हा, जि. अमरावती येथील प्राचार्य डॉ. अरविंद  देशमुख यांनी केले. स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित ‘पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ व माजी विद्यार्थी मेळावा’ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष प्रा. अंजली खेडेकर उपस्थित होत्या. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गजानन जाधव उपस्थित होते. 
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१८ च्या परीक्षेत पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधता यावा व या चर्चेच्या माध्यमातून महाविद्यालयात काही रचनात्मक कार्ये करता यावी या हेतूने माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला. ज्या महाविद्यालयाने मला खूप काही दिले त्या महाविद्यालयासाठी मी काय योगदान देऊ शकतो हा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने करावा, असा सल्ला डॉ. देशमुख यांनी दिला. आपण सोशल मीडियासारख्या बाह्य आकर्षणाला बळी न पडता समाजामध्ये सुजाण नागरिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी असे आवाहनही त्यांनी मार्गदर्शनादरम्यान केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष प्रा. अंजली खेडेकर यांच्यासह प्रा. शरद शिंगणे, देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विलास जगताप, राज्यशास्त्र विषयात सुवर्णपदक पटकावणारी विद्यार्थिनी डॉ. सरला डोईफोडे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी महाविद्यालय केवळ पदवी देण्याचे नव्हे तर सोबतच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला विधायक वळण देण्याचे कार्यदेखील करीत असते, असे प्रतिपादन केले. ज्या ज्ञान मंदिरातील ऊर्जेनं आपल्या पंखात बळ संचारतं व आपण गगनभरारी घेतो ते ज्ञानमंदिर अर्थात महाविद्यालय आपणास सदैव वंदनीय असते, या महाविद्यालयाप्रती आपला जिव्हाळा व ऋणानुबंध अधिक दृढ व्हावेत हे या कार्यक्रमाचे फलित असेल असा आशावाद प्राचार्य डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर जाधव यांनी केले, प्रास्ताविक व अतिथी परिचय डॉ. सुधीर चव्हाण यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार डॉ. विनोद बन्सीले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध क्षेत्रात कार्यरत असलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment