Friday, April 5, 2019

शहरवासीयांची पाणी समस्या लवकरच सुटणार



खडकपूर्णा नदीपात्रातील कालव्यासह चारणीचे काम अंतिम टप्यात
देऊळगांवराजा :  प्रतिनिधी
        शहराला संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पावरून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या जल पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे शहराला ऐन हिवाळ्यात पाणीबाणी सारख्या संकटाला सामोरे जावे लागले. दरम्यानच्या काळात शहराला एक महिन्याआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलपासून पाणी लांब गेल्याने शहराला पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत होती. त्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पात कालव्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शहरवासीयांचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. 
      शहराला दुष्काळी परिस्थितीचा चांगलाच फटका बसला आहे. या दुष्काळी परिस्थितीत शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. खडकपूर्णा प्रकल्पावरून शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. परंतु शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या ठिकाणचे पाणी अर्धा किलोमीटर पर्यंत लांब गेल्याने शहरावर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. ऐन हिवाळ्यात शहरावर पाणी टंचाईचे संकट आल्याने शासनाकडून कालव्याच्या चारणीसाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष सुनीता शिंदे यांनी केली होती. पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व प्रधान सचिव गोयल यांनी तातडीची बैठक घेत शहराच्या पाणी टंचाईसाठी १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. निधी मंजूर होताच संबंधित ठेकेदाराच्या वतीने कामास सुरुवात करण्यात आली. नदी पात्रात पाणी गेल्याने जॅकवेलपासून पाण्यापर्यंत जवळपास अर्धा किमी.ची चारणी करत पाणी हे जॅकवेलपर्यंत आणण्यात येत आहे. या चारणीच्या कामाला प्रत्यक्षात १ मार्चपासून सुरुवात करण्यात आली. शहराची पाणीटंचाई लक्षात घेता हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने काम अंतिम टप्प्यात आहे. १५ एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा आशावाद पालिका प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. चारणीद्वारे येणारे पाणी जॅकवेलमध्ये साठवण्यात येणार आहे. जॅकवेलमध्ये आलेले पाणी ३५ ते ४० हॉर्सपॉवरच्या दोन पंपाद्वारे शहराला पाणी पुरवठा करणार आहे. त्यामुळे शहरावर आलेले पाणी टंचाईचे संकट लवकरच दूर होणार आहे. 
      पाणीपुरवठा पंधरा दिवसांत सुरळीत होईल 
        शहरवासीयांना पुढील काळात पाणी टंचाईची झळ बसू देणार नाही. उद्भवलेली पाणी टंचाई निवारण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर काम करणे चालू आहे. जॅकवेल ते नदीपात्रापर्यंतच्या कालव्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ दिवसांत शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येईल व नागरकिांची हेळसांड थांबेल. 
                                   सुनीता शिंदे, नगराध्यक्षा न.प. देऊळगावराजा   


No comments:

Post a Comment