प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा; शिवसंग्राम ची मागणी
देऊळगांव राजा :- प्रतिनिधी
देऊळगांव राजा शहरात प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसून प्लास्टिकच्या पिशव्यांचा शहरात सर्रासपणे वापर सुरू आहे.भविष्यातील पर्यावरणाचे नुकसान थांबविण्यासाठी शहरामध्ये नगरपरिषद मार्फत प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी आज ता.८ रोजी शिवसंग्राम संघटनेने नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद आहे की,पर्यावरणाचे नुकसान थांबविण्यासाठी शासनाने २३ जून २०१८ रोजी पासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायदा लागू केला आहे.या कायद्यानुसार प्लास्टिकच्या पेशव्या,झबला थैली, प्लास्टिक ग्लास,थर्मोकोल, हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे डबे इत्यादी वर कडेकोट बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे प्लास्टिक वापरणाऱ्यावर ५००० रुपये दंड आकारला जात आहे. सर्वसामन्यासाठीचा हा दंड २०० रुपयांपासून आकारण्यात येत आहे. तर दुसरीकडे दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना ५००० ते २५००० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो.मात्र असे असताना देखील देऊळगांव राजा शहरात नगर परिषद मार्फत प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नसून शहरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रासपणे वापर सुरू आहे.शहरात प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यास येथील नगर पालिका प्रशासन सपशेल फेल ठरले आहे.राज्य शासनाने प्लास्टिक बंदी कायदा लागु केल्यानंतर सुरवातीला पालिकेने प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाई केली.मात्र आता पुन्हा प्लास्टिकचा वापर बाजारात,दुकानात सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे शासनाने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे काय? असा सवाल जनतेत उपस्थित झाला आहे.पालिकेने सुरवातीला अनेक दुकानदारांवर कारवाई केली. त्यांनतर पुन्हा नगर पालिका प्लास्टिक बंदी कायद्या संदर्भात उदासीन झाली व प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. नगर पालिकेने प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व जनजागृती केल्यास पूर्णपणे यश मिळू शकते.म्हणून भविष्यातील पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी शहरात नगरपालिका स्वछता विभागाने पुन्हा प्लास्टिक बंदी कारवाई मोहीम हाती घेतल्यास प्लास्टिक निर्मूलनास मदत होईल.त्यामुळे शहरात प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेने नगरपालिका प्रशासनांकडे केली आहे. निवेदनावर शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जहीर खान, अजमत खान, विनोद खर्डे,सुरेश निकाळजे, मदन डुरे, आयाज पठाण यादीच्या स्वाक्षऱ्या आहे.




No comments:
Post a Comment