एसटी प्रवाशांसाठी दिली आहे सुविधा
मनोरंजनासाठी होत होता वापर, आता स्टिकरही काढले
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
स्मार्टयुगात स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून लोकवाहिनी नावाने प्रसिद्ध महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस आता वायफाय रोडवर धावणार आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या मोफत वायफाय सेवा फोल ठरत आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी वाय फाय योजना बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून वायफाय कनेक्टिवीटी नसल्यामुळे एसटीचा प्रवास जगापासून तुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एसटीने बहुतांश प्रवासी चटके सहन करीत जसा जमेल तसा प्रवास करीत असतात. ज्या ठिकाणी रेल्वे नाही तसेच कोणत्याही वेळेस जाणे गरजेचे असताना हमखास मिळणारे वाहन म्हणजे एसटी. यामुळे ग्रामीण भागात दूरवरही जाता येते. कारण एसटीने जिल्ह्यातील सर्वच गावे जोडली गेली आहेत. मात्र एसटीत प्रवाशांसाठी फारशा सोयी नसल्यामुळे प्रवाशांना आजवर मन मारून प्रवास करावा लागत होता. कितीही कंटाळा आला तरी घरी परत जाण्यासाठी नाईलाजाने का होईना, एसटीशिवाय पर्याय नव्हता. परंतु, आता किमान चित्रपट किंवा फोनवर वरील अप्लीकेशनचा वापर करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवासात एकटेपणा जाणवणार नाही. परंतु या उलटही बहुतांश एसटीमध्ये बसवलेले वायफाय बंद असल्याने प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी विद्यार्थी प्रवाशांकडून होत आहेत़. एसटी महामंडळाकडून काही महिण्या अगोदर विना डेटा, सिनेमा बघा' अशा स्वरुपाच्या जाहीराती करण्यात आल्या होत्या. परंतु सध्या महामंडळाने अनेक बसमधील मोफत वायफाय कसे वापरायचे याचे जागोजागी लावले स्टीकरसुध्दा काढून टाकले आहे. एसटीच्या वतीने प्रवाशांच्या मनोरंजनासाठी राज्यभरातील एसटीमध्ये वायफाय बसवले होते. त्यामुळे विद्यार्थी व अॅन्ड्रॉईड मोबाइल वापरणारे प्रवासी प्रवासातही जगाशी जोडले होते. परंतु, हळूहळू वायफाय सुविधेचा बोजवारा वाजल्याने सदर योजना बासनात गुंडाळली गेली आहे. या वायफायची कनेक्टीव्हिटी ग्रामीण भागातील कानाकोपºयापर्यंत येत असल्याने प्रवाशांकडून वापरही त्याचप्रमाणात होवू लागला होता. परंतु, महामंडळाच्या स्वभावाप्रमाणे मोफत वायफायची ग्राहकासोबत असलेली कनेक्टीव्हीटी अचानक बंद पडल्याने प्रवाशांच्या नशिबी पुन्हा निराशा आली आहे. खासगी बस कंपन्याच्या स्पर्धेत टिकून एसटीची प्रवासीसंख्या वाढवण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आरामदायी बस तसेच दजेर्दार आणि मनोरंजनात्मक प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटीकडून वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत. मनोरंजानासाठी सर्वच गाड्यांमध्ये वायफाय बसवले होते. परंतु, देखभाली अभावी तसेच कनेक्टीव्हिटीच्या अडचणी उद्भवत असल्याने या सुविधेचे तीनतेरा वाजले आहेत. काहीच महिन्यांत एसटीमध्ये ना स्टिकर ना वायफाय सुविधा असे चित्र दिसत आहे.


No comments:
Post a Comment