Friday, June 21, 2019

श्री व्यंकटेश महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा


देऊळगाव राजा : प्रतिनिधी
       श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशिक्षक म्हणून म्यु. श्री शिवाजी हायस्कुलचे श्री. विजयकुमार तायडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव होते.
महाविद्यालयातील रा.से.यो. विभाग, शारीरिक शिक्षण विभाग व एन.सी.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या योग शिबिरात श्री. तायडे यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. पचनक्रिया सुधारण्यासाठी वज्रासन, मणक्याचे विकार यावर उपाय म्हणून उष्ट्रासन, शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी पर्वतासन आदी योगासनांची आवश्यकता व महत्व श्री. तायडे यांनी पटवून दिले. कंठ सुधारणा व घशाच्या आजारावर मात करण्यासाठी उज्जै प्राणायाम, हृदय, फुफ्फुस, किडनी हे सुदृढ व निरोगी राहावे यासाठी भस्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम ई. प्राणायाम व स्मरण शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम अशा विविध प्राणायामाची प्रात्यक्षिकासह माहिती त्यांनी प्रशिक्षणादरम्यान दिली. या शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना योग व प्राणायाम हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. योग आणि प्राणायाम हा सुखी व समाधानी जीवन जगण्याचा मूलमंत्र असून आपण दररोज योगासने करून आपली प्रकृती उत्तम ठेवावी असे आवाहन अध्यक्ष महोदयांनी केले. एन.सी.सी. अधिकारी डॉ. अनंत आवटी यांनी प्रास्ताविक करताना योग प्रशिक्षणासाठी आयोजित शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेली एकाग्रता व उत्साह याचे कौतुक केले. उपस्थितांचे आभार रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.बी. यु. काळे यांनी व्यक्त केले. योग व प्राणायाम शिबिरामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, रा.से.यो. स्वयंसेवक, एन.सी.सी. कॅडेट व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

1 comment: