शिवसेनेचे डॉ.शशिकांत खेडेकारांना होणार फायदा
देऊळगावराजा :
आगामी विधानसभेच्या निवडणुकीची समीकरणे बदलतील, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचा राज्यात प्रभाव वाढला आहे. हा प्रभाव काँग्रेस-राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरत आहे. सिंदखेडराजा मतदार संघ २० वर्षापासून राष्ट्रवादीच्या ताब्यात होता तर मागील निवडणुकीत ह्या मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकवून डॉ.शशिकांत खेडेकर आमदार झाले विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढायचे ठरवले तर लोकसभेचा कित्ता विधानसभेतही दिसून येऊ शकतो. त्यामुळे वेळीच 'वंचित'चा हात पकडण्याची धावपळ काँग्रेसमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.
भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या ४० दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने युती करत दोन आॅक्टोबर २०१८ रोजी औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर पहिली सभा घेतली. ही सभा रेकॉर्ड तोड गर्दी करणारी ठरली. या सभेनंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पायाला भिंगरी बाधून संपूर्ण राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभा घेण्याचा धडाका सुरू केला. या सभांची दखल अन्य पक्षांनाही घ्यावी लागली. निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघा खेरीज इतर कुठल्याही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले नाहीत. मात्र अनेक उमेदवारांनी लाखाच्यावर मते घेऊन 'वंचित'ची ताकद दाखवून दिली. 'वंचित'मुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पानिपत झाले. राज्यातील जवळपास दहा जागांवर 'वंचित'चा मोठा प्रभाव दिसून आला. औरंगाबादेत इम्तियाज जलील यांना दलित-मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते मिळाल्यामुळे त्यांचा विजय झाला, तसेच बुलडाणा लोकसभा मतदार संघात वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरसकर यांनी जवळपास दिड लाख मतदान घेतल्याने बुलडाणा जिल्ह्यात वर्चस्व असणारे राष्ट्रवादी पक्षाचे डॉ.राजेंद्र शिंगणे चा परभाव झाला. तसेच येणाºया विधानसभा निवडणुकीत सिंदखेडराजा मतदार संघात वंचित चा फायदा शिवसेनेचे विकासपूरुष आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांना होण्याची शक्यता नाकरता येत नाही. मात्र राज्यातील अन्य ठिकाणी मुस्लिम समाजाची मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळाली नसल्याची खंत अॅड. प्रकाश आंबेडकर आणि दलित समाजाने व्यक्त केली आहे. मुस्लिम समाजाची मते मिळाली असती तर किमान सहा जागा जिंकल्या असत्या. ही चूक आगामी विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याची तयारी आता सुरू करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत सर्व समीकरणे बदलतील, असे वंचित बहुजन आघाडीला वाटत आहे. असे असले तरी लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक काँग्रेस सुधारेल, अशाही हालचाली दिसून येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेसबरोबर गेली नाही तर अनेक मतदारसंघांत तिरंगी आणि चौरंगी लढती होतील. त्यामुळे काँग्रेस काही केल्या 'वंचित'ला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चित्र आहे. तसे झाले नाही तर 'वंचित'चा प्रभाव पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नुकसानकारकच ठरेल, अशी चर्चा आहे..



No comments:
Post a Comment