स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०१७ʼ या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी 9 आहे. राज्यातील सामाजिक वनीकरणाच्या वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. या महाविद्यालयास राज्यस्तरीय संवर्गनिहाय पुरस्कारामध्ये शैक्षणिक संस्था गटामधून राज्यस्तरावर रुपये ७५००० व सन्मानचिन्ह असे स्वरूप असणारा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून महसूल विभाग स्तरावर या महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
महाविद्यालयाने शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पर्यावरण संतुलनासाठी समर्पित भावनेने व नियोजन पद्धतीने कार्य करत या महाविद्यालयाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २०१७ चा विद्यापीठस्तरीय पर्यावरण पुरस्कार देखील पटकावलेला आहे, यावरून कोणत्याही उपक्रमात हिरीरीने सहभाग घेणे व ते कार्य तडीस नेणे याबाबतचा या महाविद्यालयाचा असलेला नावलौकिक लक्षात येतो.
महाविद्यालयातील पर्यावरण संवर्धन समितीने महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांच्या नेतृत्वात आणि प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कारासाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करणारी कामगिरी पार पाडली आहे. गत पाच वर्षांपासून महाविद्यालयामध्ये रोपवाटिका निर्माण केली जाते व पर्यावरण प्रेमींना लागवडीसाठी रोपं उपलब्ध व्हावीत यासाठी रोपवाटिका लोकार्पण सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षी दहा हजार रोपं असे गेल्या पाच वर्षात महाविद्यालयाने पन्नास हजारांपेक्षा अधिक रोपं लागवडीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. महाविद्यालयासह देऊळगाव राजा शहर व सभोवतालचा ग्रामीण परिसर पर्यावरणदृष्ट्या संतुलित व्हावा यासाठी वृक्ष लागवड करण्यात आली. शासकीय तसेच खाजगी जमिनीवर वृक्षारोपणासाठी ग्रामीण भागातील दुर्बल घटक व महिलांचा सहभाग घेण्यात आला याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत झाली. महाविद्यालयाने शास्त्रोक्त पद्धतीने महाविद्यालय परिसरात जलसंवर्धन व जल व्यवस्थापन केले आहे. सौर ऊर्जेच्या वापराबाबत महाविद्यालय नेहमी सजग असते. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सातत्याने विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले जाते. पर्यावरण संतुलनाची चळवळ ही व्यापक व्हावी या हेतूने महाविद्यालयाने ग्रामीण भागातही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढावा, वृक्षारोपणाचे महत्व ग्रामस्थांना कळावे, जलसंवर्धन व जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे हे लक्षात यावे यासाठी अनेक उपक्रमांबाबत जनजागृती केली. महाविद्यालयास हा सन्मानाचा मानला जाणारा पुरस्कार जाहीर होताच सर्व स्तरातून महाविद्यालयाचे कौतुक होत आहे व प्राचार्य डाॅ. गजानन जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


No comments:
Post a Comment