Wednesday, July 31, 2019

श्री व्यंकटेश महाविद्यालयास राज्यशासनाचा 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री-२०१७' पुरस्कार प्रदान


प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी सहकाऱ्यांसह स्वीकारला पुरस्कार
देऊळगाव राजा :  अशरफ पटेल
       महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा व सन्मानाचा मानला जाणारा 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री-२०१७' पुरस्कार  स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव, पर्यावरण संवर्धन समितीचे प्रा. निलेश काकडे,  प्रा.डॉ.महेंद्र साळवे, प्रा.ज्ञानेश्वर शिंब्रे व श्री. प्रकाश इंगळे यांनी वन राज्यमंत्री मा. परिणय फुके यांच्या हस्ते वन विभागाचे मुख्य सचिव विकास खरगे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्य वनसंरक्षक अनिल काकोडकर, अपर मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामराव, जि. प.अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घेाटेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला.
         सोमवार, दि.२९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित अभिमान महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महाविद्यालयाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय संवर्ग निहाय पुरस्कारामध्ये शैक्षणिक संस्था गटातून राज्यस्तरावर रोख रू.७५००० व सन्मानचिन्ह असे स्वरूप असणारा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. महसूल विभागस्तरावर हे महाविद्यालय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.महाविद्यालयाची आजवरची कामगिरी व मिळालेले भरपूर पुरस्कार पाहता महाविद्यालय आणि  पुरस्कार हे सकारात्मक समीकरणच झाले आहे असे वाटू लागते. ज्ञानदानाच्या बाबतीत हे महाविद्यालय प्रगत आहेच परंतु, शिक्षणासोबतच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या प्रांजळ भावनेतून महाविद्यालयाने अनेक उपक्रम राबविले आहेत.महाविद्यालयाने पटकावलेल्या या पुरस्कारामुळे देऊळगाव राजाच्या पंचक्रोशीतील पर्यावरण प्रेमींची संख्या वाढेल व पर्यावरण संतुलनाची चळवळ अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांनी व्यक्त केली.


No comments:

Post a Comment