स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा जिल्हास्तरीय स्वच्छ भारत अभियान पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाविद्यालयामार्फत राबविलेल्या स्वच्छता विषयक विविध उपक्रमाची दाखल घेत विद्यापीठाने हा पुरस्कार प्रदान केला. महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाळासाहेब काळे व क्षत्रिय समन्वयक डॉ. विनोद बन्सिले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते व रा.से.यो प्रभारी संचालक डॉ. राजेश बुरंगे, बुलडाणा जिल्हा समन्वयक डॉ. दीपक नागरिक, वाशीम जिल्हा समन्वयक डॉ. शुभांगी दामले व अकोला जिल्हा समन्वयक डॉ. संजय तिडके यांच्या उपस्थितीत ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात आल महाविद्यालयातील रा.से.यो. विभागाने प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अभिनव उपक्रम राबविले. महाविद्यालय परिसरासह देऊळगाव राजा शहर व दत्तकग्राम स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी रासेयो पथकाने नियोजनबद्ध रीतीने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. शहरातील विविध भागामध्ये रासेयो स्वयंसेवकांनी नाले व रस्ते सफाई केली. स्वछतेचा मंत्र जनमाणसात पेरण्यासाठी जनजागृती रॅली , पथनाट्य आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. दत्तकग्राम पिंपळगाव चिलमखा येथे सरपंच व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून गावकऱ्यांच्या सभा आयोजित करून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब काळे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. मधुकर जाधव, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रुपाली तेलगड व रासेयो स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. सोबतच गावाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी परस्पर सहकार्य वृत्तीने सर्वानी कार्य करण्याचे आवाहन केले. सांडपाण्याचे व्यवस्थापन, ओला कचरा, सुका कचरा असे वर्गीकरण करून तो कुजवणे व खतनिर्मिती करणे, शौचालयाचा नियमित वापर करावा अशा अनेक बाबीसंदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी स्वच्छतेची मार्गदर्शक तत्वे असलेली पत्रके वितरित करण्यात आली. दरवर्षी महाविद्यालय स्वच्छतेच्या बाबतीत अनेक नवनवीन उपक्रम राबवून स्वछ भारत अभियान यशस्वीपणे राबवित आले आहे. याची फलश्रुती म्हणूनच महाविद्यालयास हा सलग चौथा असा 'स्वछ भारत अभियान' पुरस्कार मिळाला आहे. रासेयोच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत विद्यापीठाने या अगोदर महाविद्यालयाच्या रासेयो पथकास विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट रासेयो एकक पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार यासह अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांनी प्राचार्य डॉ. गजानन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


No comments:
Post a Comment