Friday, August 9, 2019

ग्रामीण रुग्णालयाची इमारत मोजते शेवटच्या घटका


 
प्रशासनाचे दुर्लक्ष रूग्णालयाच्या छताला लागली गळती,  
देऊळगाव मही : (गजानन चोपडे) 
         खामगाव-जालना या राष्ट्रीय महामार्गावर देऊळगाव मही शहराच्या मध्यवस्तीत सर्वात मोठे बत्तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र हे ग्रामीण रुग्णालय बांधून आज बेचाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या इमारतीच्या भिंती तसेच छत जीर्ण झाले असून पावसाळ्याच्या दिवसात छताला गळती लागत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घेण्यासाठी येणाºया रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. 


         शहरासह परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी १९७७ मध्ये शहरात ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष त्र्यंबक भिकाजी खेडेकर यांच्या हस्ते या ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. या रुग्णालयाला जवळपासची २० ते २२ खेडी जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे या रुग्णालयात दररोज असंख्य रुग्ण उपचार करून घेण्यासाठी येत आहेत. शिवाय हे रुग्णालय खामगाव-जालना महामार्गावर असल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना प्रथम या रुग्णालयात उपचारार्थ आणले जात आहे. परंतु आज या रुग्णालयाच्या इमारतीला बेचाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या इमारतीच्या भिंती व छत जीर्ण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी छताला गळती लागत आहे. जीर्ण झालेल्या भिंती कधी धाराशायी होतील, याची शाश्वती नाही. चक्क वॉर्डात पाणी गळत असल्यामुळे रुग्णासह त्यांच्यासोबत येणाºया नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. या इमारतीच्या भिंती जीर्ण झाल्यामुळे रुग्णासह डॉक्टर व कर्मचाºयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच दवाखान्याचे कार्यालय तसेच जनरल वॉर्ड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छत तसेच भिंती मधून पाणी झिरपत आहे. परंतु या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाºयाचे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात दवाखान्यात विविध भागात पानी साचत आहे. जीर्ण झालेली दवाखान्याची इमारत तसेच रुग्णाचे हित लक्षात घेऊन अनेक वेळा नवीन इमारत बांधकाम करण्यात यावे. या साठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. संबधित विभागाने ग्रामीण रुग्णालयासह कर्मचारी निवासस्थानांची दरवर्षी कागदोपत्री डागडुजी करुन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. या कडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी नविन इमारत बांधण्यात यावी किंवा डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
       
       
         






 
     

No comments:

Post a Comment