Tuesday, February 4, 2020

भारतातून विश्वासाठी एका नवीन प्रजातीच्या वनस्पतीचा शोध


“सायडा सिवराजनी” असे नव्या प्रजातीच्या वनस्पतीचे नाव
 देऊळगाव राजा : प्रतिनिधी
     “सायडा” हा एक मालविसी कुटुंबातील (वर्गातील) प्रवर्ग असून विश्वात ह्या प्रवर्गातील १५६ एवढ्या प्रजाती तर भारतात २१ इतक्या प्रजाती आढळून येतात. या प्रजातीला मराठीत बला असे म्हणतात. ह्या प्रवर्गातील वनस्पती ओळखण्यासाठी बीज हे अतिशय महत्वाचे आहे. “सायडा सिवराजनी” या प्रजातीमध्ये एकूण पाच स्टीलेट हेअरी बीज (मेरीकार्प) असलेले ऑन्स आढळून येतात, ते इतर भारतातील पाच बीज मेरीकार्प असलेल्या प्रजातीमध्ये आढळून येत नाहीत, तसेच त्यांच्या जनुकांमध्येसुद्धा फरक येतो. 
        सायडा या प्रवर्गातील विविध प्रजातींच्या वनस्पतींच्या जनुकांचा अभ्यास दिल्ली विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात विभागप्रमुख प्रो. ए. के. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. डॉ. गजानन तांबडे व त्यांचे मार्गदर्शक प्रोफे. मिलिंद सरदेसाई यांनी ही नवीन प्रजात उत्तराखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि महाराष्ट्र इत्यादी राज्यांमधून शोधली. संशोधकांनी पाच वर्षे या प्रजातीच्या सर्व बाह्य गुणधर्मावर अभ्यास केल्यानंतर न्यूझीलंडमधील “फायटोटॅकसा” या नामांकित नियतकालिकाने सर्व बाबी अभ्यासून नवीन प्रजात म्हणून प्रकाशित केली. बला ही अतिशय महत्वाची औषधी गुणधर्म असलेली प्रजात आहे. या वनस्पतीचा उपयोग पोटाचे विकार, मूत्राशयाचे विकार, हत्तीरोग, अल्सर, दमा, कुष्ठरोग, रक्ताचे विकार इ. वर होतो. प्रा. डॉ. गजानन तांबडे हे वनस्पती शास्त्र विभाग, श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा येथील, प्रो. डॉ.  मिलिंद सरदेसाई हे वनस्पती शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील तर प्रोफे. डॉ. ए. के. पांडे  हे वनस्पती शास्त्र विभागप्रमुख, दिल्ली विद्यापीठ, दिल्ली येथील संशोधक आहेत. या यशाबद्दल प्रो.. डॉ. अविनाश आडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, प्रो. डॉ. अरविंद धाबे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, डॉ. बा. आं. म. विद्यापीठ औरंगाबाद आणि श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. राजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. गजानन जाधव, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. निलेश काकडे तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संशोधक प्रो. डॉ. मिलिंद सरदेसाई व प्रा. डॉ. गजानन तांबडे यांचे अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment