देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध खेड्यांमध्ये पुणे, मुंबईसह राज्य आणि देशाच्या विविध कोरोनाग्रस्त शहरातून मोठ्या प्रमाणात तरुण परतले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता या तरुणांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता त्यांचे बिनधास्तपणे गावभर हुंदडणे सुरूच आहे. त्यांचे हे बिनधास्त वागणे गावकºयांच्या जीवावर बेतू शकते हे या तरुणांना सांगूनही त्यांच्या वागण्यात बदल होत नसल्याने स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे.
नोकरी, धंद्यानिमित्त प्रत्येक गावातील १० ते १२ तरुण पुणे, मुंबईसह अनेक औद्योगिक नगरांमध्ये स्थायिक झाले आहेत. कोरोनाचा फैलाव सुरू होताच या तरुणांनी कुटुंबकबिल्यासह आपापल्या गावात परतणे पसंत केले आहे. स्वत:सह कुटुंबातील इतर सदस्यांचा बचाव करण्यासाठी त्यांनी शहरे सोडून गावच्या निरोगी वातावरणाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गावात आलेल्या या तरुणांनी स्वत:सह कुटुंबातील इतर सदस्यांना क्वारंटाइन करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र या तरुणांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याऐवजी गावातील मित्रपरिवारांच्या भेटीगाठींवर भर देण्यात आला आहे. आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि सरपंचांकडून या तरुणांना समज देऊनही त्यांच्या वागण्यात बदल होत नसल्याने स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे. म्हणून आपण घराचे बाहेर पडू नका असे वेळेचे आत आपली तपासणी करुन ध्या असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment